जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । दवाखान्यात दाखल असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने गुरुवारी दीपक रतिलाल सोनार (वय ६५) व मुलगा परेश (३४) या पिता-पूत्राने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आदर्शनगरात उघडकीस आली होती. दरम्यान, आता दुर्दैवी बाब अशी की उपचारादरम्यान पत्नीचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रध्दा दीपक सोनार (वय-६०) असे मृत महिलेचे नाव आहे.
आदर्श नगरात प्लॉट क्रमांक १९० येथे दीपक सोनार हे आपल्या पत्नी आणि मुलगासह राहत होते. दरम्यान, मागील गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पत्नी न्यूमोनियामुळे एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे दोन दिवसात दीपक सोनार यांचे जावाई रूपेश सोनार आणि मुलगी रूपाली सोनार यांनी दीड लाख रुपये रोख कॅश भरली होती. प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे पुन्हा त्यांना ५ लाख रुपये भरण्यासाठी सांगितले होते. या आर्थिक विवंचनेतून त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असल्याने नातेवाईकांकडून बोलले जात आहे. दुपारी मुलगी रूपाली यांनी वडील दीपक सोनार यांना घरी जाण्यास सांगितले होते.
सायंकाळी जावाई व मुलगी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आदर्शनगरातील घरी आले. वडील दीपक सोना व भाऊ परेश सोनार यांचे मृतदेह त्यांना आढळून आल्याने रूपालीने एकच आक्रोश केला. याबाबत रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काल शुक्रवारी सकाळी दोघांवर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. त्यातच उपचारार्थ दाखल असलेल्या श्रध्दा सोनार यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे आदर्श नगरातील सोनार कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.