⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !

गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माजी मंत्री आणि जळगाव मनपातील भाजपचे नेते गिरीषभाऊ तुम्हाला कोरोनामुक्त रामराम. तुम्ही नशिबवान आहात, अजून एकदाही कोरोना तुमच्याकडे फिरकला नाही. आमच्या सारखा सामान्य माणूस ‘पुन्हा येईन पुन्हा येईन’ च्या धास्तीने मानसिक कोरोनाग्रस्त झालेला आहे. पुन्हा येण्याच्या भीतीने कोरोनासोबतच फडणवीसची सुद्धा भीती वाटायला लागली आहे. आजकाल कोण कोरोना सोबत आणि कोण फडणवीस विरोधात हे सुद्धा समजत नाही. पण तुम्ही फडणवीस सोबत कायम आहात. फारच लकी आहात. ना सीडीची भीती ना ईडीची चिंता.

गिरीषभाऊ, असे कळले की, जळगाव मनपातील भाजपमध्ये महापौर बदलाची टूम सुरू आहे म्हणे. मनपातील भाजपचे कर्ताकरविता आपणच आहात. जळगाव शहराला विधानसभेचा भाजपचा आमदार व लोकसभा मतदार संघाला भाजपचा खासदार निवडून आणायचे श्रेय आता तुमचे एकट्याचेच. मनपा ते दिल्ली व्हाया मुंबई आणि रिटर्न जामनेर अशी भाजपची सत्ता आहे. माफ करा गिरीषभाऊ, कोरोना संसर्गाचा विषाणू मागील वर्षी अवतरला आणि त्याने माणसांची वाट लावली. तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपला भरभरून यश देणाऱ्या जळगाव शहराला मात्र असुविधांचा कोरोना गेल्या ७/८ वर्षांत लागला आहे. मनपात सुद्धा फारसे काही चांगले घडले नसते. जर कोरोना काळात विद्यमान महापौर भारतीताई सोनवणे आणि स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे हे स्वतःचा जीव तळ हातावर घेऊन बाहेर पडले नसते तर…

mayor bharti sonawane corona

जळगाव मनपातील कार्यपद्धती रसातळाला गेली होती. हॉटेलातून डबे मागवून खाणे आणि खाता-खाता इतरांना शिव्या घालणे सुरू असायचे. २५ कोटी रुपये निधी खर्चाचा घोळ व पत्रापत्री नागरिकांना माहिती आहे. वॉटरग्रेसचा ठेका का काढला, तो पुन्हा का दिला ? हे सुद्धा जळगावकरांना माहिती आहे. रस्ता तयार करण्यापूर्वी रस्ते दुभाजक तयार होणारे जळगाव हे एकमेव शहर आहे. या दुभाजकांचा मूळ ठेकेदार कोण ? दुसरा कोण ? तिसरा कोण ? इथपर्यंतची चर्चा जळगावकरांना माहिती होते. नाल्यावर पूल बांधलेला आहे, तरीही त्याच्या बांधकामाचे टेंडर निघते. शिवाजीनगर ते जिल्हा परिषद भागात वीज जोडणीच्या टेंडरमधील हिस्सेदारीतून ८/१० नगरसेवक भांडतात. टोळके करून फिरणारे आणि प्रत्येक कामात हिस्सेदारीसाठी धावणारे यापूर्वी काही छायाचित्रात दिसले आहेत. सफाई ठेकेदाराकडून दरमहा १५ हजार रुपये मिळतात अशा संभाषणाच्या आॕडिओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसने शेअर केल्या आहेत. असा कित्ती-कित्ती पंचनामा करायचा.

bharati sonawane

उपरोक्त बदनामीच्या गदारोळात गेल्या वर्ष-दीड वर्षात महापौर म्हणून भारतीताई सोनवणे यांची कारकिर्द आश्वासक ठरली आहे. जळगाव शहर कोरोना रुग्ण संख्येत देशात अव्वलस्थानी होते. तेव्हापासून सोनवणे दाम्पत्य स्वतःच्या जीवाची वा कुटुंबाची पर्वा न करता धावधाव धावत आहेत. कैलास सोनवणे यांच्याकडे सोपवलेली तक्रार काही तासात मार्गी लागते. गल्लीबोळात फिरून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेणारी सोनवणे यांची स्वतंत्र यंत्रणा आहे. ही यंत्रणा आढावा सुद्धा घेते आणि आढावू घटकांना ठिकाणावरही आणू शकते. कोरोना उपचार केंद्रात वर्षभरात सोनवणे दाम्पत्याने दिलेला वेळ हा घरी मुला-बाळांसाठी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त आहे. केंद्रातील नास्ता, जेवण, सोय, सुरक्षा याचा अनुभव सोनवणे दाम्पत्य वारंवार घेत असते. मनपातील सर्वच विभाग अधिकारीही सध्या तत्परतेने काम करीत आहेत.

mayor bharti sonawane

जळगावकरांसाठीच्या अशा आश्वासक वातावरणात दाद मागण्याची एक जागा महापौर भारतीताई सोनवणे यांच्या कक्षात आहे. तेथे अवेळी नेतृत्व बदलाची घाई गिरीषभाऊ तुमच्या सारख्या चाणाक्ष नेत्याने मुळीच करायला नको. ‘वर्ष भरात जळगाव बदलून दाखवतो’ हे म्हणणे जसे कृतीतून करायला अवघड आहे तसेच खूर्चीसाठी ‘भाऊ मला महापौर करा’ अशा अपेक्षा इतरांनी करणे गैर नाही. पण नेता म्हणून तुम्ही कठोरपणे सांगायला हवे, ‘कोरोनाचा हा काळ जात-समाज याचे गणित पाहून महापौर नियुक्तीचा नाही. आताच्या संकटात स्वतः जगून इतरांनाही जगवायची धडाडी असलेलाच महापौर हवा. सध्या तरी भारतीताई सोनवणे या तसे काम करीत असताना त्यांना पुढे चाल देण्यात काय हरकत आहे ?’ या शहराने दर सहा महिन्यांनी बदललेले महापौर पाहिले आहे. आज त्यांना लग्नपत्रिका देताना कोणीही माजी महापौर असे लिहित नाही. एवढे त्या पदाचे अवमूल्यन झाले आहे. जास्त लिहायची गरज नाही. बाकी माणसांचा, जात-समाजचा लेखाजोखा तुमच्याकडे आहेच.

bharti sonawane

– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार

(सदर पोस्ट तुम्ही जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांच्या फेसबुक वॉलवर देखील वाचू शकता.)

author avatar
दिलीप तिवारी
जेष्ठ पत्रकार आणि आपल्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध