⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024

न्हावी येथे शेतमजुराची विहिरीत उडी मारून आत्महत्या

0
farmer commits suicide by jumping into a well

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । यावल तालुक्यातील न्हावी येथे एका आदिवासी शेतमजुराने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. प्यारसिंग रेमसिंग बारेला (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

न्हावी येथील शेतकरी टेनु बोरोले यांच्या न्हावी शिवारातील शेतात काल १५ मार्च रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्याच शेतात कामास असलेल्या प्यारसिंग बारेला यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्यारसिंग बारेला याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी केले.

याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास स.पो.नि. प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. प्यारसिंग बारेला यांच्या पश्चात  पत्नी, दोन विवाहीत मुली आणि एक मुलगा आहे.

युवाशक्ती फाऊंडेशनला पुरस्कार प्रदान

0
awarded to yuvashakti foundation

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । युवाशक्ती फाऊंडेशनला कोरोना काळात सेवा बजावल्या बद्दल बारामती येथील युवाश्रम प्रतिष्ठान तर्फे रिअल हिरो कोरोना योद्धा पुरस्कार २०२१ पुरस्कार देण्यात आले. 

युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, पियुष हसवाल व प्रीतम शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारले. युवाशक्ती फाऊंडेशन ने लॉकडाऊन काळात जेवण वाटप, आरोग्य सर्वेक्षण, जिल्हा प्रशासनाला ट्रॅव्हलिंग परवान्याच्या कामात मदत, आर्सेनिक अल्बमचे वाटप, इत्यादी क्षेत्रात सेवा दिली. या कार्याला बघता सदर पुरस्कार देण्यात आले.

दुचाकी अपघातात दापोऱ्यातील तरुण ठार

0
dapora accident

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । नातेवाईकाचे लग्नकार्य आटोपुन घरी परत येत असताना दुचाकीचा अंजनी धरणाजवळ अपघात होऊन यात दापोरा येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडलीय. दीपक प्रकाश वाणी (वय-४३ रा. दापोरा ता.जि.जळगांव) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

 

दिपक प्रकाश वाणी हे सोमवारी दापोरा ता.जळगाव येथे नातेसंबंधातील लग्नाला गेले होते. लग्न आटोपल्यावर ते दुचाकीने टाकळी ता.पाचोरा येथे एरंडोल मार्गे परत जात असतांना संध्याकाळी त्यांची दुचाकी अंजनी धरणाच्या पाटात कोसळली त्यात ते जागीच ठार झाले. याबाबत एरंडोल पोलीसांना माहिती मिळताच संदीप सातपुते, अनिल पाटील, राजेश पाटील हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. 

यावेळी कासोद्याकडून परत येणारे प्रदीप हिम्मत मराठे यांनी मदतकार्य केले. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला भाऊसाहेब उर्फ अनिल प्रकाश वाणी यांनी फिर्याद दिल्यावरून अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. माञ दुचाकीचा क्रमांक समजू शकला नाही. मृत दिपक वाणी हे शेतकरी होते असे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,भाऊ,पत्नी व २मुले असा परिवार आहे. सहायक फौजदार विकास देशमुख व जुबेर खाटीक हे पुढील तपास करीत आहेत.

एरंडोल येथे कोरोना जनजागृती मोहीम व नागरिकांना मास्क वाटपाचा उपक्रम

0
erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । एरंडोल तालुका पत्रकार संघ व एरंडोल तालुका औषध विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ मार्च रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी एरंडोल बस स्थानक-आगार,पंचायत समिती कार्यालय,तहसिल कार्यालय या गर्दीच्या प्रमुख कार्यालयांमध्ये जाऊन पञकार व औषध विक्रेत्यांनी विनामास्क असलेल्या नागरीक व कर्मचार्यांना गुलाबपुष्प व मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी काहीजणांकडे मास्क असुनही त्यांनी खिशात ठेवलेले आढळुन आले तर विनामास्क नागरीक व कर्मचारी मोठ्या प्रमाणात आढळुन आले. पञकार व औषध विक्रेत्यांनी या मोहीमेत मास्क वापरा,सोशल डिस्टन्सचे पालन करा असे आवाहन केले.

याशिवाय ‘नो-मास्क-नो-एन्ट्री, या योजनेची प्रभाविपणे अंमलबजावणी करावी अशी विनंती संबंधित कार्यालयांच्या प्रमुखांना केली.

प्रमुख कार्यालयांना भेटी दिल्यानंतर शहराच्या मुख्य बाजारपेठेकडे मोहीम वळविण्यात आली. बुधवार दरवाजा,छञपती शिवाजी महाराज चौक,भगवा चौक या ठिकाणी विनामास्क आढळुन आलेल्या नागरीकांना गुलाबपुष्पासह मास्क वितरीत करण्यात आले. या उपक्रमास नागरीकांकडून उत्स्फूर्त प्रतीसाद मिळाला. 

या मोहीमेत जिल्हा पञकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील,एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष कैलास न्याती, किशोर भक्कड, भूषण पाटील, मनोहर पाटील, महेश पाटील, पिन्टू सोनार, उदय पाटील, अजय महाजन हे औषध विक्रेते, पञकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी, उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, सुधीर शिरसाठ, दिपक बाविस्कर, कोषाध्यक्ष कमरअली सैय्यद, कैलास महाजन, शैलेश चौधरी,  प्रा.नितीन पाटील, पंकज महाजन, संजय बागड, चंद्रभान पाटील, कुंदन ठाकुर, प्रविण महाजन, मनोहर ठाकुर, रोहीदास पाटील, दिनेश चव्हाण, रतन अडकमोल, देविदास सोनवणे, अजय वाघ इत्यादी सहभागी झाले.

एरंडोल बस आगार व्यवस्थापक व्ही.एन.पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एरंडोल बसस्थानकावरील ध्वनिक्षेपकावरून ‘मास्क नाही तर एस-टी त प्रवेश नाही, अशी सुचना देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.

धक्कादायक बातमी; जामनेरातील क्वारंटाइन सेंटरमधून 15 कोरोनाबाधितांचा पोबारा

0
15 corona patients escaped from the quarantine center in jamnera

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असतानाच जामनेरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  येथील एका क्वारंटाइन सेंटरमधून 15 रुग्ण पळाल्याची खळबळ घटना समोर आली आहे. 

याबाबत माहिती कळताच क्वारंटाइन सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांची जामनेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

जामनेर येथील क्वारंटाईन सेंटरमधून कोरोननाबाधित 15 रुग्ण पळाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांअभावी रूग्ण पळाल्याची चर्चा आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होत असून, या कोविड सेंटरमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. वारंवार प्रशासनाकडे मागणी करून देखील लक्ष दिले जात नसल्याने अखेर या क्वारटाईन सेंटरमधून कोरोनाबाधित रुग्णांनी तिथून पळ काढला, असे सांगितले जात आहे. या फरार रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा तपास पोलीस करत आहेत.

ट्रॅक्टरची मोटरसायकलला धडक ; पारोळ्यातील २२ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । अमळनेर रस्त्यावर अज्ञात ट्रॅक्टरने मोटर सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पारोळ्यातील २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना १५ मार्चला घडलीय. 

स्वामी माधवराव (बाळासाहेब) पाटील (२२) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी पारोळा पोलिसात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

स्वामी पाटील व त्याचा मित्र हे अमळनेर रस्त्याने मोटरसायकल (क्र.एम.एच. १९- ७२५६) ने घराकडे येत असतांना समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात स्वामी पाटील याला डोक्याला मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याच्या मित्रास पायला जबरदस्त मार लागला. स्वामीप्रसाद हा सिव्हील इंजिनियर होता. त्याच्या पश्चात आई, वडिल, बहिण, ४ भाऊ, असा परिवार असुन तो पारोळा येथील दै.देशदुतचे जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांचा लहान मुलगा तर पत्रकार योगेश आणि नितिन पाटील यांचा लहान भाऊ होत. स्वामीच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत पारोळा पोलीसात अज्ञात ट्रॅक्टर चालका विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

केंद्राच्या खासगीकरण धाेरणाच्या विरोधात जनरल इन्शुरन्स, विमा कर्मचाऱ्यांचा उद्या संप

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धाेरणाला विराेध करण्यासाठी १७ मार्च राेजी नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, ओरिएन्टल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स या चार कंपन्यांचे, तर १८ मार्च राेजी एलआयसीचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. जिल्ह्यातील एलआयसीचे २०० कर्मचारी या संपात सहभागी हाेतील.

डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने एक अध्यादेश काढत विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ वरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढवली. या अध्यादेशाला कायद्याचे स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे, केंद्र सरकारच्या खासगीकरण धाेरणाला विराेधासाठी देशातील जनरल इन्शुरन्स आणि एलआयसीचे कर्मचारी लागाेपाठ दाेन दिवस संपावर जाणार आहेत.

खासगी विमा कंपन्या वगळता सरकारी सगळ्याच विमा कंपन्यांचे कामकाज ठप्प हाेणार आहे. संयुक्त किसान माेर्चा व केंद्रीय कामगार संघटनांचा या संपाला पाठिंबा असून संयुक्त निर्णयानुसार या तीनही संपाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. १५ मार्च हा दिवस खासगीकरण विराेधी दिन म्हणून पाळण्यात आला. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात बँक व विमा व्यवसायाचे खासगीकरण व केंद्र सरकारची मालकी विक्री करणे या भूमिकेला या संपातून विराेध नाेंदविला जाणार आहे.

भाजपच्या सत्ता उतार होण्याचा काळा वर्तमान

0
dilip tiwari jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । दिलीप तिवारी । जळगाव मनपाची गेली निवडणूक (सन २०१८) तशी लुटूपुटूची लढाई ठरणार होती. भाजप-शिवसेना युती होणार हे गिरीश महाजन व सुरेशदादा जैन यांनी एकत्रित सांगितले होते. युती झाली असती तर विरोधातील इतर पाला-पाचोळा होते. तसे ते आजही आहेत. मनपात केवळ ३ पक्षांचे नगरसेवक निवडून येतात. ज्यांचे नगरसेवक निवडून आलेले नाहीत ते पाला-पाचोळा. युती होणार अशा अपेक्षेत जैन निवांत होते. पण भाजपत स्वतंत्र लढण्याचा दबाव वाढल्यानंतर महाजन यांनी युती मोडीत काढून ‘मैत्रिपूर्ण लढत करु या’ असा निरोप एका खुळखुळ्यासह जैन यांना दिला. ही मैत्रिपूर्ण लढत म्हणजे, प्रचार जास्त अंगात आणायचा नाही आणि भरपूर पैसा ओतायचा नाही या तोंडी समन्वयातून करायची सुद्धा ठरले.

पण गिरीश महाजन यांनी निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधून शिवसेनेला तोंडघशी पाडायचे ठरविले. सत्ताप्राप्ती हेच अंतिम उद्दिष्ट जेव्हा असते तेव्हा त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा पवित्रा घ्यावा लागतो. महाजन यांनी तो पवित्रा घेतला पण जैन हे महाजन यांच्या मैत्रीचा खुळखूळा वाजवत बसले. तसे पाहिले तर जैन यांच्याकडे मनपा निवडणूक जिंकण्यासाठी फारसे प्रचाराचे मुद्दे नव्हतेच. घरकूल घोटाळा, तुरुंगवारी, विधानसभा निवडणुकीत पराभव हे नकारात्मक मुद्दे होते. शहर विकास आघाडीच्या कारकिर्दवर जळगावकर, व्यापारी, उद्योजक नाराज होतेच. हे लक्षात घेऊन जैन यांनीही शहर विकास आघाडी ऐवजी शिवसेनेच्या झेंड्याखाली मनपाची पहिली निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. अशातच भाजप सुद्धा स्वतंत्रपणे प्रतिस्पर्धी झाला.

महाजन हे जैनांशी मैत्रीची भाषा बोलत होते पण निवडणूक जिंकायला लागणारे उमेदवारही जैन यांच्या तालिमीत तयार झालेले घेत होते. शिवसेना, नगर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशा सर्वच पक्षातून उमेदवारांची आयात महाजन यांनी केली. महाजन किंवा भाजपवरील अती प्रेमातून ही आयात झाली असावी ? या प्रश्नाचे उत्तर कधीही ‘हो’ असे असूच शकत नाही. साम, दाम, दंड, भेद याचा वापर महाजन यांनी केला. ते सहाजिक होते, महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे कोणाला तडीपारीचा, कोणाला चौकशांचा, कोणाला ठेकेदारीचा लॉलीपाप देऊन भाजपचा निवडणूक तंबू उमेदवारांनी भरला. तंबूत एवढी तोबा गर्दी झाली की मूळ भाजपचे असलेल्या उमेदवारांना डावलले गेले. भाजपची ही निवडणूक जिंकण्याकडे होणारी वाटचाल फसवी, दिखाऊ होती. निष्ठा नसलेले लोक सोबत घेतल्याने त्यात प्रतिष्ठा नव्हती आणि टाकाऊ सुद्धा होती.

‘मी जळगावच्या राजकारणात टिकून आहे’, हे जैन यांना दर्शविणे आवश्यक होते. पण गिरीश महाजन यांच्यासाठी जळगाव मनपाची निवडणूक आणि तीत मिळू शकणारा संभाव्य विजय हा फार मोठ्या राजकीय संधीचा भाग होता. पण महाजन यांचे निवडणूक प्रचारापासूनचे नियोजन घिसाडघाई, उथळ, शाब्दीक खेळ व कोट्या करण्याचे राहिले. जळगाव शहरात राजकारणाचे नवे पर्व सुरू करायला जळगावकर उत्सुक आहेत एवढ्या एकाच मानसिकतेचा तात्कालिक लाभ घेणारे नियोजन महाजन यांनी केले. एवढेच नव्हे तर महाजन यांची भाषा सुध्दा उथळ आश्वासने देणारीच होती. ‘एक वर्षात जळगाव बदलून दाखवतो’ हे वाक्य त्याच उथळपणाचे उदाहरण.

जळगावकरांची दिशाभूल करणारा, खंडीभर आश्वासनांचा जाहिरनामा भाजपने जळगावकरांच्या हाती दिला. त्याचे शिर्षक होते, ‘विसंबून कुणावरही नसलेला, सक्षम, दमदार व खऱ्या वचनांचा’ आज तीन वर्षानंतर महाजन ना जळगाव बदलू शकले ना वचननाम्यातील शिर्षकाशी प्रामाणिक वागले. हा जाहिरनामा, उसनवार उमेदवार, पक्षाकडून मिळालेली रसद (म्हणजे काय ? हे विचारणारा ठार मूर्ख) आणि जळगावकरांचीही बदलाची इच्छा या बळावर भाजपने ७५ पैकी ५७ जागा जिंकल्या. १५ जागा शिवसेनेला कशाबशा मिळाल्या. एमआयएम ३ जागा जिंकली. बाकी पाला-पाचोळा कायम होता.

जळगाव मनपा भाजपने जिंकली. पण शहराचा कारभार चालविण्याचे कौशल्य ना महाजन यांच्यात दिसले ना आयात केलेल्या मंडळींमध्ये दिसले. जवळपास अडीच वर्षांचा काळ ठराविक समर्थकांची कुटुंबगिरी, कोंडाळेगिरी आणि पडद्या मागील कमिशनगिरीतच गेला. पहिले महापौरपद जेव्हा आमदाराच्या घरातच दिले गेले त्याच दिवशी मनपातील भाजप फुटीच्या उंबरठ्यावर गेली. भाजपची नंतरची सत्ता लेवा, कोळी, मराठा या सामाजिक गणितावर विभागली गेली. कार्य, कर्तृत्व, दृष्टी या गुणांचा विचारच झाला नाही. वॉटरग्रेसच्या ठेक्यात कोणी कमिशन खाल्ले याची जेव्हा शहरात चर्चा सुरू झाली तेव्हाच गल्लीबोळातील भाजप नगरसेवकांनाही गटार, रस्ते, पथदीप, सफाई, दुभाजक अशा कामांमध्ये कमिनश मिळावे असे वाटू लागले. याच इर्षेतून २५ कोटींची कामे सार्वजिक बांधकामला की मनपाला हा वाद रंगला. कोण कशाला पाठिंबा देतो आणि कोण विरोध करतो हे सोशल मीडियात बोलले जाऊ लागले. कमिशनचा असाच वाद शिवाजी नगर उड्डाण पुलाजवळील हाय टेंशन केबल स्थानांतराचा होता. हे काम महावितरणला की मनपाला या विषयाने नगरसेवकांच्या असंतोषाची वाफ बाहेर काढली.

दरम्यान, भाजपचा पोकळ आश्वासनांचा जाहीरनामा गटांगळ्या खाऊन अमृत योजनांच्या खड्ड्यात गाडला गेला. भाजपने काय काय खोटेनाटे त्यात लिहिले होते हे आज डोळ्यांसमोर येते. प्रधानमंत्री आवास योजना, सूट मालमत्ता करात, कर्मचारी विकास, अग्निशमन दल, शिक्षण, उड्डाणपूल, महिला सक्षमीकरण, युवक व क्रिडा विकास, सुरक्षित जळगाव, वाहतुकीचे नियोजन व पार्किंग व्यवस्था, आरोग्य व स्वच्छता, उद्याने व विकास, फेरीवाला नियोजन, स्मशानभूमी, आपत्ती व्यवस्थापन, समांतर रस्ते, उद्योग विकास, अमृत योजना हे विषय महाजन यांनी स्वतः कधी वाचले का ? महाजन या विषयावर पत्रकार परिषदेत कधी बोलले आहेत का ? याचे उत्तर ‘महाजन ठरले बोलघेवडे.’ ना नियोजन ना अंमलबजावणी. महाजन मंत्री होते पण जळगावचे पालक जाले नाही. हे संकटमोचक हवेतच उड्डाणे करीत राहिले.

जळगाव शहरातील बदलाची अशीच एक संधी भाजपला यापूर्वीही मिळाली होती. लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला होता. भाजपने त्यालाच लाच खाऊ ठरवून बेड्या घालून शहरात पायी फिरवले होते. एका पार्टीत मारले ही होते. सआज तीच अवस्था भाजप नेत्यांची आहे. भाजपचा बहुमताचा डोलारा कोसळतो आहे. संकट मोचक म्हणून महाराष्ट्रभर फिरणारे आज जळगावच्या रस्त्यावर एक एक नगरसेवक शोधत आहेत. हा भ्रमनिरास जळगावकरांचा नाहीच. जळगावकरांनी ३३ वर्षे सुरेशदादांना सत्ता दिली. त्यांनी अनेक विकास प्रकल्प केले सुद्धा. पण भाजपला एक हाती सत्ता देऊनही तीन वर्षात ५७ नगरसेवकांचा अंतर्गात विश्वास मिळवता आला नाही. तेच फुटून पळाले. भाजपने जाहीरनाम्यात छापलेले शेवटचे पान सर्व संबंधितिंचे तोंड काळे करणारे आहे.

जय जय … श्रीराम ….

– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार 

हे देखील वाचा :

होय… भाजपचे ३० नगरसेवक फुटले… कुलभूषण पाटलांसह ३३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

नाथाभाऊंचा गिरीशभाऊंना दे धक्का? महापालिकेतील काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

भाजपच्या फुटीर नगरसेवकांना गटनेत्यांची ‘वॉर्निंग’

0
bhagat balani jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । शहर मनपातील सत्ताधारी भाजपचे ३० नगरसेवक फुटीर निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दि.१८ मार्च रोजी महापौर, उपमहापौर निवडीसाठी निवडणूक होणार असून कुणीही गडबड करू नये यासाठी भाजप गटनेते भगत बालाणी यांनी माध्यमात जाहिरात देत व्हीप जारी केला आहे. व्हीपच्या माध्यमातून त्यांनी कायद्याची जाणीव करून देत सर्वांना सूचनाच दिली आहे.

भाजप गटनेते भगत बालाणी यांनी प्रसिद्ध केलेल्या पक्षादेशमध्ये म्हटले आहे की,

पक्षादेश (व्हिप)

सन्मा. सर्व नगरसेवक /नगरसेविका भारतीय जनता पार्टी महानगरपालिका, जळगाव

महोदया,
मी, भारतीय जनता पक्षाचा गटनेता म्हणून आपणांस पक्षादेश (व्हिप) देत आहे की, दिनांक १८ मार्च २०२१ रोजी जळगांव शहर महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आहे. तरी आपण सदर निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे महापौर व उपमहापौर पदाचे अधिकृत उमेदवार यांना वेळेवर ऑनलाईन उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार ठरतील त्यांना मतदान करावे. असा पक्षादेश (व्हिप) भारतीय जनता पक्षाचा गटनेता म्हणून आपणांस देत आहे.

सदर पक्षादेशाचे (व्हिपचे) आपण पालन करणे बंधनकारक आहे. सदर पक्षादेशाचे (व्हिपचे) पालन करण्यास आपण कसूर केल्यास महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ३ नुसार महानगरपालिका सदस्य म्हणून अनर्ह होण्यास पात्र रहाल याची नोंद घ्यावी. वरील पक्षादेशाचे (व्हिप)चे आपण काटेकोरपणे पालन करावे.

आपला विश्वासू
(बालाणी भगतराम रावलमल) गटनेता, भारतीय जनता पक्ष जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव

अशा प्रकारे भाजपचे नगरसेवक फुटू नये म्हणून त्यांना अगोदरच सूचना देत कारवाई होऊ शकते याची जाणीव करून देण्यात आलेली आहे.

हे देखील वाचा : 

होय… भाजपचे ३० नगरसेवक फुटले… कुलभूषण पाटलांसह ३३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव महानगरपालिकेत विरोधकांचा घोडेबाजार; गिरीश महाजनांची टीका

आ.राजुमामा भोळेंमुळे फुटणार भाजप?

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!