जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धाेरणाला विराेध करण्यासाठी १७ मार्च राेजी नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, ओरिएन्टल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स या चार कंपन्यांचे, तर १८ मार्च राेजी एलआयसीचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. जिल्ह्यातील एलआयसीचे २०० कर्मचारी या संपात सहभागी हाेतील.
डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने एक अध्यादेश काढत विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ वरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढवली. या अध्यादेशाला कायद्याचे स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे, केंद्र सरकारच्या खासगीकरण धाेरणाला विराेधासाठी देशातील जनरल इन्शुरन्स आणि एलआयसीचे कर्मचारी लागाेपाठ दाेन दिवस संपावर जाणार आहेत.
खासगी विमा कंपन्या वगळता सरकारी सगळ्याच विमा कंपन्यांचे कामकाज ठप्प हाेणार आहे. संयुक्त किसान माेर्चा व केंद्रीय कामगार संघटनांचा या संपाला पाठिंबा असून संयुक्त निर्णयानुसार या तीनही संपाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. १५ मार्च हा दिवस खासगीकरण विराेधी दिन म्हणून पाळण्यात आला. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात बँक व विमा व्यवसायाचे खासगीकरण व केंद्र सरकारची मालकी विक्री करणे या भूमिकेला या संपातून विराेध नाेंदविला जाणार आहे.