⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

भाजप पुन्हा सत्तेवर येणार : गिरीश महाजनांचा पुर्नरुच्च्चार

जळगाव लाईव्ह न्युज | ३० मे २०२२ । राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरत आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विकासाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात. यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष किमान ५० जागा मिळवून पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.


रावेर तालुक्यातील तामसवाडीजवळील श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिर प्रांगणात झालेल्या रावेर तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, शेतकरी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख सुरेश धनके, मेळाव्यास उपस्थित होत्या.

आमदार महाजन म्हणाले, की मुख्यमंत्री हे मौन बाळगून आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो की शेतकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न ते काहीच बोलत नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे व्यक्तींच्या आदेशावर चालणारे पक्ष असून, भाजप संघटनेवर चालणारा पक्ष असल्याचे सांगून शिवसेनेने भाजपची साथ सोडली याचा त्यांना पश्चाताप होईल, असेही त्यांनी सांगितले.