मोठी बातमी : बोरखेडा हत्याकांडाची 13 मार्चपासून होणार सुनावणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । राज्यात गाजलेल्या रावेर तालुक्यातील बोरखेडा बु.॥ येथील हत्याकांडाची भुसावळ सत्र न्यायालयात 13 मार्चपासून नियमित सुनावणी होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांनी सोमवारी दुपारी भुसावळ सत्र न्यायालयाबाहेर दिली. बोरखेडा बु.॥ शिवारातील एका शेतात 14 वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्यानंतर तिच्यासह चौघा भावंडांची कुर्‍हाडीचे वार करीत हत्या करण्यात आली होती. 15 ऑक्टोंबर 2020 रोजी घडलेल्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

मूळ गावी 14 ऑक्टोबर 2020 रोजी गेल्यानंतर घरी चारही मुले एकटीच होती. ही संधी साधून नराधम आरोपीने मध्यरात्रीच्या सुमारास 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केला व त्याचवेळी भावंडांना जाग आल्यानंतर 11 व 8 व तीन वर्षीय भावंडांची कुर्‍हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली होती. हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास करीत आरोपी निष्पन्न करून त्यास बेड्या ठोकल्या होत्या तर सध्या आरोपी कारागृहातच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हत्याकांडाची 13 पासून सुनावणी
बोरखेडा हत्याकांड प्रकरणाचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांच्याकडे असून सोमवारी दुपारी त्यांनी सत्र न्यायालयात येत न्या.आर.एम.जाधव यांच्याकडे खटल्यासंदर्भातील कागदपत्रे सोपवली आहे. 13 मार्चपासून या खटल्याची नियमित सुनावणी भुसावळ सत्र न्यायालयात होणार असल्याची माहिती त्यांनी न्यायालयाबाहेर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, 13 ते 15 मार्च दरम्यान बोरखेडा खटल्यातील सुमारे 40 साक्षीदारांची तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांच्या तपासाची केंद्राने घेतली होती दखल
बोरखेडा हत्याकांडाचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध मिळालेल्या परीस्थतीजन्य, वैज्ञानिक आणि शास्त्रीय पुराव्यामुळे या गुन्ह्याची उकल झाली होती. बोरखेडा हत्याकांडाच्या घटनेची राष्ट्रीय स्तरावरील केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ पोलीस रीसर्च ऍन्ड डेव्हलोपमेंट (बीपीआरअ‍ॅण्डडी) संस्थेने अभ्यासासाठी व प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली तर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडियन पोलिस सायन्स कॉन्फरन्स या संस्थेनेही बोरखेडा येथील हत्याकांडाच्या गुन्ह्याची डॉ.मुंढे यांनी केलेल्या तपासाची नोंद घेतली होती.