जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । महाराष्ट्रात शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली. राज्याच्या राजकारणात घडलेल्या या घडामोडींनंतर आता झारखंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. झारखंडमधील भाजपचे १६ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)ने केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सुप्रियो भट्टाचार्य यांनी राज्यातील भाजपचे १६ आमदार अस्वस्थ आहेत त्यामुळं ते झारखंड मुक्ती मोर्चाला पाठिंबा देऊ शकतात. सुप्रियो यांच्या मते भाजपचे १६ आमदार वेगळा गट स्थापन करुन सोरेन सरकारला पाठिंबा देऊ शकतात. आमचा पक्ष १६ आमदारांच्या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करत असल्याचं म्हटलं. झारखंडमध्ये भाजपचे २६ आमदार आहेत.

सुप्रियो भट्टाचार्य यांना पत्रकारांनी हेमंत सोरेन यांच्या सरकारला धोका असल्याचं विचारलं होतं. काही काँग्रेस आमदारांना भाजपकडून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचं विचारल्यावर सुप्रियो भट्टाचार्य यांनी भाजपचे १६ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं.
भाजपने दावा फेटाळला
तर तिकडे झारखंडमधील भाजपने झामुमो नेत्यांचा दावा फेटाळून लावला आहे. आमचे आमदार बंडखोरी करणार नाहीत आणि भाजपत कुठलीही फूट पडणार नाही असा दावा भाजपने केला आहे. भाजपचे प्रवक्ते प्रतुल शहदेव यांनी म्हटलं, झामुमोचे आमदार हे भ्रष्टाचारात अडकले आहेत. त्यांचा पक्ष आपली अस्मिता वाचवण्यासाठी लढा देत आहे. त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झामुमोचे आमदार लूट आणि भ्रष्टाचार करत आहेत. त्यांना खोटं बोलून आपला दर्जा जपायचा आहे.












