⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

खुशखबर.. तब्बल अडीच वर्षांनंतर रुळावर येणार भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, ‘या’ तारखेपासून धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर गत अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस (Bhusawal-Pune Hutatma Express) आता पुन्हा एकदा रुळावर येणार आहे. येत्या १० जुलैपासून भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस सेवा सुरु होणार आहे. पूर्वीच्याच वेळेनुसार ही गाडी पुण्याकडे निघेल. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी मार्च २०२० मध्ये रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर कोरोना कमी झाल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात अली. परंतु भुसावळ येथून सुटणारी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी अद्यापपर्यंत बंदच होती. ही गाडी नाशिक, ईगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, खंडाळामार्गे पुण्याला जाते. यामुळे भुसावळ विभाग आणि जिल्ह्यातील प्रवासी, चाकरमान्यांना कल्याण, पनवेलला जाण्यासाठी ही गाडी
खूपच सोईस्कर ठरते.

मात्र अडीच वर्षांपासून ही गाडी बंद प्रवाशांची गैरसोय होत होती. ही गाडी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात हाेती. तसेच लोकप्रतिनिधींकडूनही गेल्या सहा महिन्यापासून पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले जात होते. परंतु आता रेल्वेने येत्या १० जुलैपासून हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेसह खर्चात मोठी बचत होणार आहे.

गाडीची का होती गरज :
भुसावळातील हजारो लोक कामधंदा, व्यवसाय, नोकरी, शिक्षणासाठी पुणे, मुंबईला स्थायिक आहेत. मात्र, एसटीचा संप असल्याने मध्यंतरी पुण्याला ये-जा करण्यासाठी केवळ खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय होता. पण, त्यांचे १२०० ते १५०० रूपये भाडे परवडत नसल्याने हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी होती. ती आता पूर्ण झाली आहे. रात्री १२.२० वाजता सुटेल : हुतात्मा एक्स्प्रेस १० जुलैपासून पुन्हा ट्रॅकवर येईल. यानंतर रात्री १२.३५ वाजता म्हणजेच पूर्वीच्याच वेळेनुसार ही गाडी पुण्याकडे निघेल. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, खंडाळा आणि पुणे असा प्रवास करेल.

पॅसेंजर गाड्या अद्यापही बंदच
एकीकडे रेल्वेकडून अनेक गाड्या पूर्ववत केले जात असले तरी भुसावळ येथून सुटणाऱ्या अनेक पॅसेंजर गाड्या अद्यापही बंदच आहे. त्यामुळे खेड्यापाड्यावरील नोकरीनिमित्त अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. येत्या तीन दिवसात जनरल तिकीट सेवा सुरु होत आहे. असे असले तरी दुसरीकडे पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांना आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहेत. सध्या पॅसेंजर ऐवजी मेमू गाड्या सुरु करण्यात आल्या असल्या तरी या गाड्यांना एक्स्प्रेसचे भाडे प्रवाशांकडून आकारले जात आहे. त्यामुळे रेल्वेने आता लवकरच पॅसेंजर गाड्या सुरु करून प्रवाशांना दिलासा द्यावा.