जळगाव जिल्हारेल्वे

पुणे-दानापूर विशेष रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या! जळगाव, भुसावळच्या प्रवाशांना दिलासा !

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी, छठ पूजा आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे-दानापूर आणि दानापूर-पुणे या विशेष रेल्वेगाड्यांच्या संचालन कालावधीत वाढ करण्यात आली आहे. या गाड्या जळगाव आणि भुसावळ मार्गे धावत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

पुण्याहून बिहारकडे जाणाऱ्या तसेच बिहारमधून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पुणे-दानापूर आणि दानापूर-पुणे या दोन्ही दिशांच्या विशेष रेल्वेगाड्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी ०१४४१ पुणे-दानापूर द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे यापूर्वी १३ नोव्हेंबरपर्यंत चालवण्याचे नियोजन होते. मात्र, सणासुदीच्या काळातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आता या गाडीचा कालावधी १४ ते २८ नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. या कालावधीत या गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. दरम्यान, गाडी ०१४४२ दानापूर-पुणे द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडीचा कालावधीही वाढवला आहे. ही गाडी यापूर्वी १३ नोव्हेंबरपर्यंत धावणार होती. आता १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान तिच्या एकूण आठ फेऱ्या होणार आहेत.

या विशेष गाडीला दोन्ही दिशेने हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा स्थानकांवर थांबे आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button