मोठी बातमी ! भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंचे जात प्रमाणपत्र अवैध ; खुर्चीवर टांगती तलवार?

एप्रिल 25, 2026 1:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ (Bhusawal) नगरपालिकेच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलीय. लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे (Gayatri Bhangale) यांचे जात प्रमाणपत्र जळगाव जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. यामुळे त्यांचे नगराध्यक्षपद आता धोक्यात आले असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

gayatri bhangale

काय आहे नेमकं प्रकरण?

भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे गायत्री भंगाळे यांनी भाजपच्या रजनी सावकारे (मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी) यांचा पराभव केला होता. उमेदवारी अर्जासोबत भंगाळे यांनी भुसावळ प्रांताधिकाऱ्यांनी दिलेले एस.सी. प्रवर्गाचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र, त्यांच्या जातीच्या दाखल्यावर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत जात पडताळणी समितीने सखोल चौकशी केली आणि अखेर त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे.

जळगाव जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा नयना बोदर्डे आणि सदस्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. पुराव्याअंती गायत्री भंगाळे या अनुसूचित जाती प्रवर्गातील नसल्याचे स्पष्ट झाल्याने समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. विशेष म्हणजे, चुकीचे प्रमाणपत्र जारी केल्याप्रकरणी भुसावळच्या तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

पुढील कायदेशीर पेच?
नियमानुसार, निवडून आल्यानंतर ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र (Validity) सादर करणे आवश्यक असते. त्यापूर्वीच प्रमाणपत्र अवैध ठरल्याने भंगाळे यांना आपले पद गमवावे लागण्याची शक्यता आहे. आता या निर्णयाविरोधात त्या न्यायालयात दाद मागणार की भुसावळला नवीन नगराध्यक्ष मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now