धक्कादायक: भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे अपात्र; नगरविकास विभागाकडून आदेश निर्गमित

मे 5, 2026 8:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून निवडून आलेल्या भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री रूपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश सोमवारी निर्गमित केले.

gayatri bhangale

नगरविकास विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांनी काढलेल्या आदेशानुसार, गायत्री भंगाळे यांचे अनुसूचित जाती प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने २३ एप्रिल २०२६ रोजी एका आदेशान्वये अवैध ठरवले होते. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जळगावचे जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार नगरविकास विभागाने त्यांच्या निवडीस रद्द ठरविण्याचा अंतिम निर्णय घेतला. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, भंगाळे यांना नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून राहण्यास अपात्र ठरवण्यात येत असून त्यांच्या अपात्रतेची नोंद शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

भुसावळ नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि गाजलेली ठरली होती. हे पद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गायत्री भंगाळे यांनी भुसावळ प्रांताधिकाऱ्यांनी दिलेले एस.सी. प्रवर्गाचे प्रमाणपत्र जोडून उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणुकीत त्यांनी नगराध्यक्षपदावर विजय देखील मिळविला होता. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर रजनी सावकारे, प्रमोद सावकारे, राहुल तायडे, संजय तायडे अशा चार जणांनी आक्षेप घेत जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. सुनावणीदरम्यान तक्रारदारांनी गायत्री गौर-भंगाळे यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील महोबा असल्याचा दावा करत वडील व काकांच्या शालेय नोंदीत ‘कुर्मी’ अशी जात नमूद असल्याचे पुरावे सादर केले होते. स्थलांतरित व्यक्तींना दुसऱ्या राज्यात अनुसूचित जातीचा लाभ मिळत नाही, असा युक्तिवादही त्यांनी मांडला होता. त्यानुसार त्यांना अपात्र ठरविण्यात आले.

आतापर्यंत आम्हाला कोणताही अधिकृत शासकीय आदेश प्राप्त झालेला नाही. आम्ही कायद्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली असून ५ मे रोजी सुनावणीची तारीख आहे. पुढील न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
गायत्री भंगाळे, नगराध्यक्ष, भुसावळ

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now