जळगाव लाईव्ह न्यूज | १८ एप्रिल २०२३ | राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार, या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईची वाट धरली आहे. दरम्यान, कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चर्चा सुरु असल्याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर अजित पवार यांनी खुद्द खुलासा केला आहे.
अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतांना आता अजित पवार यांच्यासोबत ५३ पैकी ४० आमदार असल्याचं एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तांत म्हटले आहे. अजित पवारांबरोबर सध्या १५ च्या आसपास आमदार जायला तयार आहेत, यात पक्षातील काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. असं असताना यावर आता अजित पवारांनी मोठं भाष्य केलं आहे. नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही असं म्हटलं आहे.
दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत असल्याची चर्चा सुरु असतांना अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे. नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले.