जळगाव महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली; आदित्य जीवने नवे आयुक्त!

जून 9, 2026 9:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मागील काही दिवसांपासून जळगाव राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. राज्य शासनाने आज सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता युपीएससी २०२१ बॅचचे तरुण आयएएस अधिकारी आदित्य जीवने जळगावचे नवे महापालिका आयुक्त म्हणून धुरा सांभाळतील.

adity jivane

कोण आहेत नवे आयुक्त आदित्य जीवने?

आदित्य जीवने हे २०२१ चे आयएएस (IAS) अधिकारी आहे. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणचे संयुक्त संचालक म्हणून कार्यरत आहेत. तरुण आणि गतिमान अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवने यांच्या नियुक्तीमुळे जळगाव महापालिकेच्या कारभाराला नवीन दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे आदित्य जीवने यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले असले, तरी विद्यमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली नेमकी कोणत्या पदावर करण्यात आली आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

राज्य शासनाच्या या तडकाफडकी निर्णयामुळे आता जळगाव महापालिकेत नव्या आयुक्तांच्या स्वागताची आणि पदभार ग्रहणाची तयारी सुरू झाली आहे. नव नियुक्त आयुक्त आदित्य जीवने जळगावच्या स्थानिक समस्या कशा सोडवतात, याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now