त्या अवैद्य दुकानांवर होणार कारवाई ? निकाल लवकरच

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जानेवारी २०२३ | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील भागात समितीनेच अवैध पद्धतीने दुकाने बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. याबाबत नागरिक व नगरसेवकांनी तक्रार केली असून, त्याबाबत गुरुवारी (ता. १९) महापालिकेत सुनावणी पूर्ण झाली असून, निकाल राखीव ठेवला आहे.

नगरसेवक रियाज बागवान, इब्राहिम पटेल यांनी महापालिकेत तक्रार केली होती. मेहरूण शिवारात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील भागात सुमारे १५० ते २०० जणांनी अवैध दुकाने बांधली आहेत. ममता हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर गणेशपुरीपासून ते शेरा चौकापर्यंत रस्त्यावर ही दुकाने बांधली आहेत. या बांधकामासाठी महापालिकेचा कोणताही परवाना घेतलेला नाही. यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या तक्रारीवरून नगररचना विभागाने तेथील दुकानदारांना नोटीस दिली होती. त्याची सुनावणी गुरुवारी महापालिकेच्या नगररचना विभागात झाली. नागरिक व दुकानदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले असून, निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. या सुनावणीदरम्यान नगरसेवक रियाज बागवान, नगरसेवक इब्राहिम पटेल, अनिस शहा, रिजवान जहागीरदार, सलीम इनामदार, सादील पटेल, जिया बागवान यांच्यासह त्या भागातील २० ते २५ नागरिक उपस्थित होते.