गुन्हेमुक्ताईनगर

मुक्ताईनगरात गुटख्याची मोठी कारवाई; 19.13 लाखांचा मुद्देमाल जप्त, यूपीचा तरुण ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर पोलिसांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत एकूण १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील २५ वर्षीय चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर पोलिसांना मंगळवारी (६ ऑक्टोबर) गोपनीय माहिती मिळाली होती की, HR-84/1073 क्रमांकाच्या वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुली येथे वाहन अडवून चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनातील मालाबाबत चालकाकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही.

त्यानंतर वाहन मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आणि पंचांसमक्ष वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

कारवाईत १० लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे प्रिमियम राजनिवास सुगंधित पान मसाल्याचे ६ हजार ७५० पाकीटे तसेच ५ लाख ७६ हजार रुपये किमतीचे प्रिमियम जेड एन-०१ जाफरानी जर्दाचे ६ हजार पाकीटे जप्त करण्यात आले. याशिवाय ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले.

अशाप्रकारे गुटखा व वाहनासह एकूण १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शुभमसिंग विद्यराम (वय २५, रा. निनावाचा, ता. किरावली, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस अंमलदार रविंद्र धनगर आणि प्रशांत चौधरी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button