जळगाव लाईव्ह न्यूज : ३१ ऑक्टोबर २०२३ : शिक्षक केवळ शैक्षणिकच काम करीत नाही तर सामाजिक जबाबदारी देखील मनापासून पूर्ण करतो. हे एका माध्यमिक शिक्षकाच्या कृतीतून पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. वडती माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक जगदीश रघुनाथ पाठक यांनी विषारी नागाने दंश केलेल्या एका १३ वर्षीय आदिवासी मुलीचे प्राण वाचविले आहे. दुचाकीने प्रशिक्षणासाठी जात असतांना पाठक सरांनी कोणताही विचार न करता व विलंब न लावता प्रशिक्षण बाजूला ठेवत मुलीचा जीव महत्त्वाचा मानून तिला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व तिचे प्राण वाचविले.
नरवाडे- विरवाडे रस्त्यावर असलेल्या शेतात काम करताना सुनीता सखाराम बारेला (रा. नरवाडे) ही १३ वर्षीय आदिवासी मुलगीला पायास दोन ठिकाणी विषारी सापाने दंश केला. त्यामुळे ही मुलगी लागलीच बेशुद्ध पडली. तिच्या शेजारी नातेवाईक रडत होते. मदतीची हाक मारत होते. अशा वेळी वडती माध्यमिक विद्यालयातील शिक्षक जगदीश पाठक हे दुचाकीने विरवाडे येथे प्रशिक्षणासाठी जात होते. त्यांनी समोरचे दृष्य पाहिले. त्यांनी लागलीच तिच्यावर प्रथमोपचार करीत दोन्ही पायांच्या वरील बाजूस घट्ट कापड बांधून क्षणाचाही विलंब न करता तिच्या एका नातेवाईकास सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
तिथे स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. पवन पाटील यांनी पाऊण तास तिच्यावर उपचार केले. पण तिची अवस्था अतिशय गंभीर होत चालल्याने तिला तत्काळ पुढील उपचारासाठी खासगी वाहनाने जळगाव येथे सामान्य रुग्णालयात पाठविले. डॉ. चंद्रकांत बारेला यांनीही मदत केली. चोपडा येथे योग्य ते उपचार मिळाल्याने ती जळगाव येथे व्यवस्थित पोहचली. याता त्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. योग्य वेळी योग्य त्या काळात आदिवासी मुलीला उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले.