⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मुंदखेडेत घर फोडले, शेतकऱ्याची ४ लाखांची रोकड लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । मुंदखेडे ( ता.चाळीसगाव ) येथे चोरट्यांनी शेतकऱ्याच्या बंद घराचे कडी-कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील ३ लाख ४९ हजारांची रोकड व दागिने असा एकूण चार लाखांचा ऐवज लंपास केला. शेतकरी रामदास धना पाटील (वय ८२) असे शेतकऱ्याचे नाव आहे. ३ लाखांची रोकड या शेतकऱ्याला चाेरीच्या दोन दिवसांपूर्वी कापूस विक्रीतून मिळाली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पाटील हे आपल्या कुटुंबासह मुंदखेडे येथे राहतात. त्यांना शेतात ३२ क्विंटल ६० किलो कापूस झाला होता. तो त्यांनी ८ रोजी व्यापाऱ्याला विकल्यानंतर त्याने रामदास पाटील यांना कापसाचे ३ लाख ९ हजार रूपये दिले. ही रक्कम तसेच त्यांच्याकडील ४० हजार रुपयांची शिल्लक रक्कम अशी एकूण ३ लाख ४९ हजारांची रोकड त्यांनी घरातील कपाटात असलेल्या पिशवीत ठेवली होती. १४ रोजी रामदास पाटील घराला कुलूप लावून कुटुंबासह भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे नातेवाईकाच्या उत्तर कार्याच्या कार्यक्रमास गेले होते. उत्तर कार्य झाल्यानंतर १५ रोजी ते सर्व घरी परतले. त्यावेळी त्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून घरात गेले असता त्यांना घराचा पाठीमागील दरवाजा अर्धवट उघडा दिसला. त्यांनी जिन्यावर जावून पाहिले असता वरच्या खोलीच्या दरवाजाचाही कडी-कोयंडा तुटलेला होता. खोलीत जावून पाहणी केली असता कपाट उघडे होते. तसेच कपाटातील तिजोरीही उघडी होती. त्यात त्यांनी ठेवलेले पैसे मिळाले नाहीत. तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी बरणीत ठेवलेले सोन्या, चांदीचे दागिनेही मिळाले नाहीत. चोरट्यांनी एकूण ३ लाख ८७ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या-विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे देखील वाचा :