जळगाव लाईव्ह न्यूज । 23 जानेवारी 2024 । एकीकडे राज्यात थंडीचा कडाका वाढला असताना राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढवलं असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्यानेही विदर्भात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 48 तासात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाच्या सरी पाहायला मिळण्याच अंदाज आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
राज्यात थंडी कायम राहणार
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. परिणामी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असून, राज्यात थंडी कायम राहील, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात किमान तापमानात हळूहळू थोडी घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.