जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२३ । शहरातील मेहरुण तलावात आंघोळीसाठी गेलेली शाहूनगरातील चार मुले पाण्यात बुडून गडांगळ्या खाऊ लागले, त्या वेळी तीन जणांना वाचविण्यात यश आले, मात्र चौथ्या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. ईशान शेख वसीम (वय १३, रा. शाहूनगर, जळगाव) असं मृत मुलाचे नाव आहे.
शाहू नगरातील ईशान शेख, मोईन खान अमीन खान, अयान तस्लीम भिस्ती व असलम शेख सलाउद्दीन हे १३ ते १४ वर्षांची मुले शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता मेहरुण तलाव परिसरातील ट्रॅकजवळ आंघोळीसाठी आले होते. काही वेळानंतर चौघे पाण्यात उतरल्यावर ते गटांगळया खावू लागले.
हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. त्या वेळी ते मदतीसाठी धावले. यातील मोईन खान, अयान भिस्ती व असलम शेख हे तिघे जण लवकर हाती लागले. त्यांना बाहेर काढून त्यांच्या पोटातून पाणी काढण्यात आले. त्यानंतर ईशान सापडला. चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ईशान याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
मृत इशानचे वडील पेंटर असून आई गृहिणी आहे. शेख दांपत्याला दोन मुली असून ईशान हा एकुलता एक मुलगा होता. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.