जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातील खूनांचे सत्र सुरूच असून रविवारी दुपारच्या सुमारास शहरातील समता नगर परिसरात एका तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे. दरम्यान, दोघे जखमी असून तीन संशयितांची नावे समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात मृताचे मित्र आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून एलसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी पोहचले आहेत.
जळगाव शहरातील समता नगर परिसरात राहणाऱ्या अरुण बळीराम सोनवणे, चुलत भाऊ आशिष संजय सोनवणे, गोकुळ बळीराम सोनवणे या तिघांवर रविवारी दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास वंजारी टेकडी परिसरात धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने दोघांना नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून अरुण सोनवणे याला मृत घोषित केले. तर आशिष यास खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती कळताच मयताच्या नातेवाईक आणि मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, खून पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून तीन संशयितांची नावे समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह कर्मचारी पोहचले असून संशयितांचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, मयत अरुण सोनवणे याच्यावर पूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता मात्र काही महिन्यांपूर्वीच न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती.