शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढणार! चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचा इशारा, कोणत्या भागात होणार पाऊस?
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२३ । शेतकऱ्यांवर संकटाची मालिका येन सुरूच आहे. आधीच अवकाळी पावसासोबत गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले असून यातून शेतकरी अद्यापही सावरला नसून त्यातच आता बंगालच्या उपसागरावर ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचं संकट आहे. ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम राज्याच्या वातावरणावरही दिसत आहे. पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, काही भागात हवामान कोरडं राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागात हवामानात गारठा जाणवणार आहे. कोकण किनारपट्टी भागात हवामान कोरडं पाहायला मिळणार आहे.
पुढील 12 तासांत चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील काही तासांत खोल दाबात रुपांतरीत होईल. यामुळे आज 3 डिसेंबरला चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील 12 तासांत चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची दाट शक्यता आहे. 4 डिसेंबरला दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तमिळनाडू किनार्याजवळ चक्रीवादळ आदळण्याची शक्यता आहे.
मुंबईत हुडहुडी
पुढील चार ते पाच दिवस मुंबईत थंडीचा हा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात घट झाली असून, पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या विविध भागातही तापमान 15 अंशांच्या खाली गेले आहे.