जळगाव लाईव्ह न्यूज : १८ सप्टेंबर २०२३ : सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे मंगळवारी आगमन होणार आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जळगावकर सज्ज झाले जिल्ह्यात एकूण ९४६ लहान-मोठे मंडळ आहेत. त्यात नोंदणीकृत ५१५ मंडळ आहेत. फुले मार्केट, सुभाष चौक, अजिंठा चौफुली, रिंगरोडवरील बाजारपेठा सजल्या आहेत. मूर्ती विक्रीसाठी फुले मार्केट परिसर, अजिंठा चौफुली परिसर, आकाशवाणी चौक ते महाराणा प्रताप पुतळा व रिंगरोडवर श्रींच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल लागले आहेत.
नवीपेठेत बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. या रस्त्यावरील आठ मार्गावर २१ तारखेपासून सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत बॅरिस लावून वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीमुळे पाचोऱ्याकडील वाहतूक ही मलंगशहा बाबा दर्ग्याजवळून वळवणार आहे. कोर्ट ते चित्रा चौक, टॉवर चौक ते चित्रा चौक, कोर्ट ते कोर्ट चौक या सुमारे अर्धा किलोमीटरच्या परिघात शहरातील प्रमुख व प्रचंड गर्दी होणारे १४ सार्वजनिक गणेश मंडळ आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळांनी प्लास्टिकचा वापर करू नये, घरगुती गणपती मूर्ती ही शाडू मातीची असावी यासाठी आवाहन केले जाते आहे. घराघरातील निर्माल्य व पूजेचे साहित्य संकलनासाठी संपूर्ण शहरात पाच कलश रथ फिरवण्यात येणार आहेत. मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे यांची विशेष नियुक्ती केली आहे.