जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२३ । मोदी सरकरने कांदा निर्यातवर ४० टक्के शुल्क लावल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी कांदा बाजारात न विकण्याचा इशारा दिला. त्यातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय सरकरने घेतला आहे.
काय आहे निर्णय?
केंद्र सरकारने 2410 रुपये प्रतिक्विंटल दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकार वरील दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. यातून कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. नाशिक व अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क
किंमत वाढण्याच्या भीतीने देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 19 ऑगस्ट रोजी कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. हे निर्यात शुल्क ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर लागू राहील. महाराष्ट्रातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी याला विरोध करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया X (ट्विटर) वर लिहिले की, ‘मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी कांद्याच्या मुद्द्यावर बोललो. केंद्र सरकार 2,410 रुपये प्रति क्विंटल दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.
त्यासाठी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात विशेष खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असून, सोमवारी लासलगावसह नाशिकमधील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (एपीएमसी) अनिश्चित काळासाठी कांद्याची विक्री बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. निर्यात शुल्क मागे घेण्याची मागणी करत नाशिक जिल्ह्यातही अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी निदर्शने केली.