जळगाव लाईव्ह न्यूज | १६ ऑगस्ट २०२३ | जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे ट्रॅक रेकॉर्ड खराब असले तरी रावेर मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे. रावेरची जागा काँग्रेसची आहे. ती कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाला जाऊ नये, अशी शिफारस पक्षश्रेष्ठीकडे करणार असल्याची माहिती काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी दिली. रावेर लोकसभा काँग्रेसनेच लढवावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्यांनी पक्षाची भुमिका स्पष्ट केली.
आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख बुधवारी जळगावात आले होते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघांचा आढावा घेतला. यावेळी समन्वयक विनायकराव देशमुख, दीप चव्हाण, मलकापूरचे आमदार राजेश एकडे, आमदार शिरीष चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डी.डी. पाटील, जि.प.चे गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, शहराध्यक्ष श्याम तायडे, सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, डॉ. जगदीश पाटील, डॉ. अनिल शिंदे यांच्यासह तालुका व शहराध्यक्ष उपस्थित होते.
काँग्रेसचे नेते गिरीश महाजनांना का घाबरतात?
डॉ.देशमुख यांनी दोन्ही मतदारसंघातील तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांकडून त्यांनी पक्षाची स्थिती जाणून घेतली. यावेळी पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला निवडणुकीत तिकीट मिळत नाही. काही जण विकले जातात. काँग्रेसचे नेते गिरीश महाजनांना का घाबरतात, असा सवाल जामनेरचे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी डॉ. सुनील देशमुख यांना केला. यावर बोलतांना डॉ.देखमुख म्हणाले की, भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर कसा सुरू आहे हे संपूर्ण देश बघत आहे. ईडी, सीबीआय तर तर कधी पोलिस यंत्रणेला हाताशी धरून वास दिला जातो. याच कारणामुळे जिल्ह्यातही गिरीश महाजनाना घाबरत असावेत, असेही देशमुख म्हणाले.