जळगाव लाईव्ह न्यूज| १२ ऑगस्ट २०२३। गेल्या पाच वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ता धारकांना महापालिकेकडून नोटीस बजाविण्यात येणार असून सदर मालमत्ता धारकांनी तातडीने मालमत्ता कर भरणा न केल्यास संबधित मालमत्ता धारकांविरूध्द कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील अनेक मालमत्ताधारकांवर मोठ्याप्रमाणात घरपट्टी, पाणी पट्टीची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करून देखील काही मालमत्ता धारकांकडून मालमत्ता कर व पाणी पट्टी भरली जात नसल्यामुळे अशा मालमत्ता धारकांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.
प्रभाग समिती अधिकाऱ्यांना आपआपल्या भागातील पाच वर्षांपासून थकबाकीदारांच्या याद्या तयार करून त्यांना नोटीस बजाविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चारही प्रभाग समिती कार्यालयांतर्गत येणाऱ्या ३ हजार ६०० मालमत्ता धारकांना नोटीस बजाविण्यात येणार असून तरी संबधित मालमत्ता धारकांनी थकबाकी न भरल्यास त्यांच्या मालमत्ता सील करणे, जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
चारही प्रभाग समिती कार्यालयातील ३६ बिल कलेक्टर यांना प्रत्येकी १०० थकबाकीदारांच्या याद्या तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून त्या याद्यानुसार नोटीस बजाविण्यात आले आहेत.