जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । काही दिवसापासून शेतकऱ्यांना ज्याची भीती होती अखेर तसेच झालं. राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घेतला आहे. जळगाव जिल्ह्यास सह राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळं कापणी झालेली ज्वारी व वेचणीयोग्य कापसाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज शनिवारी संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या चार ते पाच दिवसात जळगावसह राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात ६ आणि ७ ऑक्टोबरला जोरदार पावसाचा इशारा दिला होता. जिल्हा प्रशासनानेही अलर्ट जारी केला होता. अखेर पावसाचा हा अंदाज खरा ठरला. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेपाच वाजता अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. नंतर रात्री ११ वाजेनंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.

आज देखील संपूर्ण राज्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आजपासून ११ ऑक्टोबरपर्यंत जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढणार आहे. आधीच मागील गेल्या दोन ते तीन दिवसात झालेल्या या पावसामुळं काढणीला आलेलं सोयाबीन आणि वेचणीच्या तोंडावर असलेल्या कापूस पिकांचं मोठं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी शेतात सोंगणी करुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात सापडलं आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
जिल्ह्यात आज परतीच्या मान्सूनचे आगमन?
दरम्यान, परतीचा मान्सून राजस्थानात रेंगाळल्यामुळे त्याचा परतीचा प्रवास तीन दिवस उशिराने सुरु झाला. खान्देशात ५ पर्यंत मान्सून परतीच्या प्रवासाला येण्याची शक्यता होती मात्र, आता आज म्हणजेच ८ ते ९ ऑक्टोबरदरम्यान, जळगाव जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अदांज वर्तविण्यात आला आहे. मात्र त्यापूर्वी जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.












