
जळगाव लाईव्ह न्यूज । ऐन श्रावणात पावसाने उघडीप घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. जळगावात अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामानाच्या उपलब्ध अंदाजानुसार आजपासून २४ ते ३० ऑगस्टदरम्यान जळगावात तुरळक ते हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. मात्र, या काळात सर्वदूर किंवा जोरदार पावसाची शक्यता कमी दिसत आहे.

जुलै महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे पिकांना मोठा आधार मिळाला होता. शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासून मात्र पावसाने पुन्हा दडी मारली.

मध्यंतरी काही दिवस तुरळक सरी बरसल्या. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप घेतली आहे. सध्या आकाशात ढगांची गर्दी होत असली, तरी पावसाच्या सरी बरसत नसल्याने ढगाळ वातावरण असूनही पाऊस गायब अशी परिस्थिती जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
बहरलेल्या पिकांना पावसाची गरज
सध्या खरीप हंगामातील पिकांची वाढ चांगली होत असून, अनेक ठिकाणी पिके बहरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन, मका आणि इतर खरीप पिकांना सध्या पावसाची गरज आहे. आणखी काही दिवस पावसाची उघडीप कायम राहिल्यास बहरलेल्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.
पुढील काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. २५ आणि २६ ऑगस्टला हलक्या सरी किंवा एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता असून, २७ ऑगस्टलाही तुरळक पाऊस होऊ शकतो. २८ ऑगस्टलाही काही भागांत हलक्या सरींची शक्यता असून त्यानंतर पुन्हा पावसात उघडीप राहण्याचा अंदाज आहे.
पारा पुन्हा ३४ अंशांपर्यंत
पावसाची तीव्रता कमी असल्याने तापमानात फारशी घट होणार नाही. पुढील दिवसांत कमाल तापमान साधारण ३० ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २६ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः २९ आणि ३० ऑगस्टदरम्यान कमाल तापमान पुन्हा ३३ ते ३४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जळगावात आकाश ढगाळ राहिले तरी पावसाची संततधार नसल्याने वातावरणातील दमटपणा आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेचे प्रमाणही तुलनेने जास्त राहणार असल्याने तापमानापेक्षा अधिक उष्णतेचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो.






