muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यात यावर्षी महिनाभरापासून सुरु असलेले शेतकऱ्यांच्या कृषीविजपंपांच्या केबल चोरीचे सत्र सुरूच असून आज मध्यरात्री पुन्हा तालुक्यातील सुकळी-दुई परीसरातील शेती शिवारातुन १५-२० शेतकऱ्यांच्या केबल चोरी गेल्याची घटना घडली. याबाबत काही शेतकरी बांधवांनी मुक्ताईनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शेतकरी वसंत बळीराम तळेले व आनंदा साहेबराव पाटील यांच्या शेतातील बंदिस्त खोलींचे दरवाजे तोडुन खोलीत ठेवलेल्या केबल चोरुन नेल्या शिवाय चालु ट्युबवेलच्या केबल कापुन नेल्या. तसेच सुनिल पांडुरंग पाटील, काशिनाथ श्रीपत पाटील,राजेंद्र भानुदास तळेले,तुषार फेगडे,रविंद्र नाना पाटील यांच्यासह अनेक शेतकरी बांधवांच्या ट्युबवेलवरील केबल चोरुन नेल्या. याशिवाय इलेक्ट्रॉनिक साहित्यांची तोड फोड केली. दरम्यान गत काही दिवसांपूर्वी या शिवारातील विद्युत ट्राॅन्सफार्मरचे आॅईल चोरी गेल्याची घटना घडली.महिनाभरापासुन परिसरात केबल चोरींचे सत्र सुरु असुन वारंवार चोरीमुळे शेतकरी वैतागला आहे.प्रत्येक शेतकऱ्याला तीन-चार हजार रुपयांचा भुर्दड बसत असुन या एकाच महिन्यात तीन वेळा केबल चोरीमुळे शेतकऱ्यांना हजारोंचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच रात्री शेती शिवारात जायला शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरी केलेल्या केबल मधिल तांब्याच्या धातुची तार काढुन चोरटे पसार!
वसंत तळेले यांच्या शेतात खोलीजवळ केबलमधील तार काढलेल्या अवस्थेत होती. तसेच घटनास्थळी पाण्याच्या कॅनमधील पाणी पित चोरट्यांनी खाल्लेला खर्राचा कागद व सागर पानमसाला पुडीचा खाली कागद मिळुन आल्याने चोर म.प्रदेशातील असावे असा संशय शेतकरी बांधव व्यक्त करीत आहे. दरम्यान वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे शेतकरी वैतागलेअसून पोलिस प्रशासनाने पुरेपुर लक्ष घालुन या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जात आहे. तसेच पोलिस प्रशासनाकडून रात्रीची गस्त वाढवावी अशीही मागणी त्रस्त शेतकरी करीत आहे.