जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । छत्रपती संभाजी राजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची बैठक अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी स्वराज्याचे प्रवक्ते करण गायकर हे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून आशिष नाना हिरे दिनेश नरवडे हे होते. जिल्हा स्वराज्याच्या निमंत्रक पदी सुनील देवरे पाटील व मनोहर शिंदे यांची निवड करण्यात आली.
स्वराज्याचे प्रवक्ते करण गायकर यांनी स्वराज्याच्या शिलेदारांना स्वराज्य संघटने विषयी माहिती दिली, स्वराज्य संघटनेचे ध्येयधोरण समजून सांगितले. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये स्वराज्य या संघटनेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्याने ही पुढाकार घेतल्याने आपल्या सगळ्यांचे मनस्वी आभार स्वराज्य संघटना ही प्रस्थापित लोकांची नसून विस्थापित लोकांना प्रस्थापित करण्यासाठी आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळात छत्रपती संभाजी राजे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
त्यावेळी जळगाव जिल्ह्यातही ते येणार आहेत म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे गाव तिथे स्वराज्य संघटन उभे राहिले पाहिजे. प्रत्येक गाव निहाय स्वराज्याच्या वतीने राबविले गेलेले उपक्रम पोहोचविले पाहिजे. त्या ठिकाणी त्या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत स्वराज्याची माहिती कळविण्यासाठी आपण येणाऱ्या काळात काम करावे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने स्वराज्याचे शिलेदार उपस्थित होते.