जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । बी.यू.एन. रायसोनी स्कूल पिंप्राळा येथे गुरूपोर्णिमानिमित्ताने लहान विद्यार्थी शिक्षक व मातृपूजन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.

आई आपली सर्वांत पहिली गुरू असते. आपल्या बाळामध्ये संस्कार रुजवण्याचे काम सर्वांत पहिल्यांदा करते त्यानंतर संस्कार रुजवण्याचा वारसा शिक्षक करीत असतो. या गोष्टी विद्यार्थ्यांना कृतीतून समजविण्यासाठी या शिक्षक व मातृपूजनाचे आयोजन करण्यात आले. या वेळेस इ. १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये आपल्या आईचे व शिक्षकांचे औक्षण करुन त्यांना नमस्कार करुन आर्शिवाद घेतला. यासाठी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या मातांना विशिष्ट वेळेत बोलविण्यात आले. त्यांच्या पाल्यांकडून त्यांच्या मातेचे व वर्गशिक्षकाचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्षा ललिता टिपरे, मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी व्यास मुनींच्या प्रतीमेच्या पुजनाने केली. या कार्यक्रमास वेळात वेळ काढून आलेल्या मातांचे शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी कौतूक केले. सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकवृंदांना गुरूपोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.












