जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । शिवाजी नगर भागात असलेल्या विविध समस्या, रस्त्यांबाबतच्या सततच्या तक्रारी,या भागात धुळीमुळे होणार त्रास,काम न करणारे कर्मचारी यामुळे नागरिकांचा रोज वाढत असलेला त्रास या सर्वांचा पाढाच आज आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या समोर या भागातील नागरिकांनी मांडळी.

शिवाजीनगर रेल्वे पूल तुटल्यापासून शिवाजीनगरचा जळगाव शहराशी संबंधच तुटला आहे. कारण मनपातील अधिकाऱ्यांना शिवाजी नगरमधील नागरिकांकडून फक्त कर घेण्यापुरता संबंध ठेवला आहे. वास्तविक शिवाजीनगर मध्ये जवळपास 70 ते 80 हजार लोकवस्तीचा परिसर येतो परंतु त्यामानाने सुविधाचा अभाव आहे. त्यातच सध्या अमृत योजनेमुळे रस्ते खोदले गेले असून धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून लहान मुले व ज्येष्ठांना याचा अत्याधिक प्रमाणात त्रास होतोय म्हणून लवकरात लवकर आपण शिवाजी नगर मधील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा तसेच शिवाजीनगर मधील साफसफाईचा प्रश्न हा महत्वाचा असून या युनिटचे अधिकारी हे प्रत्येक वेळी एकच उत्तर देतात आमच्याकडे मनुष्यबळ कमी असून आम्ही येऊ शकत नाही. आपण नागरिक म्हणून केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही संबंधित अधिकारी व कर्मचारी स्पष्टपणे कामचुकारपणा करतात असे दिसून येते. तरी अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्वरित बदली करण्यात येऊन तेथे कार्यक्षम अधिकारी व कर्मचारी नेमावेत जेणेकरून नागरिकांना स्वच्छतेचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आमच्या भागात गंभीर झालेला आहे. संपूर्ण शेवाळयुक्त पिवळे पाणी नागरिक पीत असून बहुतेक नागरिकांना याचा त्रास होऊन आजारी पडले आहेत.

यासह शिवाजीनगर हे विविध समस्यांनी ग्रासले असून मनपाकडून शिवाजीनगर भागाला न्याय दिला जात नसेल तर कृपया आम्हाला ग्रामीण भागामध्ये वर्ग करण्यात यावे वरील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण न झाल्यास आम्ही शिवाजी नगर राहिवासीयांकडून जन आंदोलन करण्यात येईल असे आशयाचे निवेदन देत शिववंदन फाउंडेशनचे अध्यक्ष विजय राठोड,उपाध्यक्ष विशाल वाघ,विनोद कोल्हे यांच्या सह नागरिकांनी सह्या केल्या आहे.











