ग्रामस्थांची सतर्कता : मुक्ताईनगरमध्ये पकडला अवैध लाकडांचा ट्रक

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । फक्त शेतीचा सातबारा उतारा जवळ बाळगुन शेती परीसरातील सढृड व डेरेदार वृक्षांची सर्रासपणे कत्तल करुन इमारती लाकडांची अवैधपणे वाहतुक करणारा ट्रक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पडण्यात आला असून हल्ली वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान वनविभागाकडुन कायदेशीर कारवाईची प्रक्रीया सुरु आहे.

avaidya

अधिक माहिती अशी की, दि. २८ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास डोलारखेडा गावाजवळ ट्रक क्र. ( एम.पी. ४६ एच ०२१८ ) हा ताडपत्रीने कडुलिंबाच्या लाकडांनी भरलेला माल झाकुन कुऱ्ह्याकाकोडाकडुन पुरनाड फाट्याकडे जात असल्याचे डोलारखेडा येथील ग्रामस्थ व वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद थाटे यांना लक्षात आले. त्यांनी ट्रक अडवून संबंधितांकडे परवाना बाबत विचारणा केली असता परवाना न मिळुन आल्याने वनविभागाने कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित ट्रक रावेर येथील काझी नामक व्यापाराचा असल्याची माहीती मिळत असुन सदर व्यापाऱ्याने यासंदर्भात कोणतीही रितसर परवानगी न घेता परीसरातील शेती-शिवारातुन डेरेदार कडुलिंबाच्या वृक्षा़ची कत्तल करुन ट्रकद्वारे विनापरगी लाकुड वाहतुक करताना आढळुन आल्याने वनविभागाचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी ए.आर. बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी.टी. पाटील यांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. वनरक्षक बी.के. थोरात, वनरक्षक जी.बी. गोसावी, वन समिती अध्यक्ष विनोद थाटे यांच्यासह समितीतील काही सहकाऱ्यांनी सतर्कता दाखवत कामगिरी पार पाडली. तसेच महेंद्र गरुड, वनमजुर अशोक पाटील, सिद्धार्थ थाटे, संजय सांगळकर यांचेही सहकार्य लाभले. दक्षिण डोलारखेडा वनरक्षक बी.के. थोरात यांनी एफ आर सोडुन मुद्देमालासह सदरचा ट्रक डोलारखेड्याहुन वडोदा वनपरीक्षेत्र कार्यालयात घेत जमा केला आहे. ट्रकमधील माल मजुरांअभावी उतारला गेला नाही त्यामुळे मोजमापासह इतर कायदेशीर सोपस्कार पार पडले नसल्याने नेमके किती घनमीटर लाकुड आहे? किती किंमतीचा? याबाबत समजु शकले नाही.

सदर व्यापाऱ्याकडे कोणतीही परवानगी आढळुन आली नाही.चिंचखेडा बु येथील एका शेतकऱ्याच्या नावाचा फक्त सातबारा उतारा व्यापाऱ्याकडे आहे. चौकशीदरम्यान संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जावुन तुटलेल्या झाडांची पाहणी करण्यात येणार असल्याचे समजते. मात्र कोणतीही परवानगी न घेता ५०-६० किमीपर्यत येऊन शेतकऱ्यांना भुलथापा देत शेती-शिवारातील मोठमोठी डेरेदार झाडे मातीमोल भावात घेऊन कत्तल करीत आहे. अवैध वृक्षतोड संदर्भातील कायदे कठोर असुन देखील लाकुडतोड्यांची हिम्मत वाढली तरी कशी? असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या तापमानाकडे बघता झाडांचे महत्व अबाधित आहे. एकीकडे शासन झाडे जगविण्यासाठी प्रयत्नशील असुन एक झाड जगविण्यासाठी तीन वर्षापर्यत संगोपनासाठी एका झाडावर तब्बल सुमारे २३००० रुपये खर्च करीत आहे. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान देत बांधावर फळझाडे लागवडीसाठी प्रोत्साहित करीत आहे. मात्र दुसरीकडे प्रोढ झाडे संबंधित व्यापारी शेतकऱ्यांना तुटपुंजे अमिषे दाखवुन सर्रासपणे कत्तल करुन पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास करीत असल्याची वस्तुनिष्ठ परीस्थीती आहे. अशा प्रकारचे प्रकार खपवुन घेतले जाणार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अनेक पर्यावरणप्रेमीकडुन मिळत आहे. याप्रकरणी कायदेशीररीत्या कोणतीही कसर न ठेवता कारवाई व्हावी जेणेकरुन भविष्यात अशा घटनांना आळा बसेल अशी मागणीवजा अपेक्षा स्थानिक वृक्षप्रेमीकडुन होत आहे.

दरम्यान, संबंधिताकडे परवानगी नाही, याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आशुतोष बच्छाव प्रभारी वनक्षेत्रपाल वडोदा वनक्षेत्र यांनी सांगितले तर तीन दिवसांपासुन अवैधरीत्या लाकुड वाहतुक करणारा ट्रक पकडला आहे मात्र वनविभागाकडुन याबाबत अद्यापर्यत कारवाई पुर्ण झालेली नाही. कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरुन अशा प्रकारांना आळा बसेल. – विनोद थाटे वन समिती अध्यक्ष डोलारखेडा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories