जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) अनिलकुमार लाहोटी यांनी शुक्रवारी भुसावळ दौरा केला. यात मनमाड ते भुसावळ सेक्शनची पाहणी त्यांनी केली. यावेळी मध्य रेल्वेतील पाचही विभागांसाठी भुसावळात मेमू कारशेड उभारले जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) अनिलकुमार लाहोटी यांनी पत्रपरिषदेत दिली.

तसेच भुसावळ येथून अप-डाऊन करणार्यांच्या मासिक पासबाबत लवकरच प्रक्रिया सुरू केली जाईल. आता प्रवासी हे तिकीट घेऊन प्रवास करीत आहे. रेल्वे बोर्डाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळताच पास दिला जाईल. प्रवाशांना मिळणार्या इतर सुविधाही पुरवल्या जातील असेही ते म्हणाले आहे. या वेळी डीआरएम एस. एस. केडिया, एडीआरएम नवीन पाटील, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वाणिज्य प्रबंधक बी. अरुणकुमार व अन्य अधिकारी उपस्थित होते.

भुसावळ येथील 150 एकर जागेवरील अतिक्रमण काढले असून त्या जागेवर कोच फॅक्टरी उभारली जाणार होती. मात्र, त्याऐवजी आता मेमू रेल्वे गाड्यांचे वर्कशॉप (मेमू कार शेड) सुरू केले जाणार आहे. 150 कोटी रुपये खर्चाचे मेमू शेड 100 एकर जागेवर उभारले जाईल. मध्य रेल्वेतील भुसावळसह नागपूर, मुंबई, पुणे, सोलापूर या विभागांतील हे पहिलेच मेमू वर्कशॉप आहे. या सर्व विभागांतील मेमू गाड्या येथे देखभाल, दुरुस्तीसाठी येणार आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हातालाही काम मिळेल, असेही लाहोटी यांनी सांगितले.
आता पाचोरा-जामनेर ब्रॉडगेजबाबत मार्चपर्यंत निर्णय
पाचोरा-जामनेर नॅरोगेज गाडीचे दोन्ही इंजिन आणि डबे हे कालबाह्य झाले आहे. कोरोनाच्या काळातच ही गाडी बंद केली. या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर केले जाणार आहे. त्यासाठी मंजुरी मिळाली असून तिन्ही विभागांकडून सर्व्हे होत आहे. तो रेल्वे बोर्डाला पाठवून मार्चपर्यंत त्यावर निर्णय होईल, असे लाहोटी म्हणाले.
लवकरच धावणार ताशी 130 वेगात रेल्वेगाडी
भुसावळ विभागातील शुक्रवारच्या दौर्यात जीएम लाहोटी यांनी विशेष जीएम स्पेशल गाडी ही ताशी 130 किमीच्या वेगात चालवण्यात आली. विभागातील रूळ व जमीन चांगली आहे. त्यामुळे लवकरच भुसावळ विभागात ताशी 130च्या वेगात मेल, एक्स्प्रेस या गाड्या धावू लागतील, त्यामुळे गाड्यांचा वेळ वाचेल.
हे देखील वाचा :
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल
- LPG सिलिंडर ते बँकिंग..! १ ऑगस्टपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार ; खिशावर होणार थेट परिणाम
- रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत १ ऑगस्टपासून मोठा बदल; काय आहे घ्या जाणून..
- साडेपाच हजार वर्षांचा इतिहास असलेले यावलचे महर्षी व्यास मंदिर; वाचा काय आहे अख्यायिका…











