गुन्हेजळगाव शहर

दिवाळीपूर्वीच जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ! पाण्याच्या मोटारींसह बुलेट लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीच्या सुटीत अनेक नागरिक बाहेरगावी जात असल्याने बंद घरांना चोरटे लक्ष्य करतात. मात्र, यंदा दिवाळीची सुटी सुरू होण्यापूर्वीच जळगावात चोरट्यांनी हात साफ करण्यास सुरुवात केली आहे. पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीलगत असलेल्या सचिन कॉलनी आणि इंद्रदेवजी नगरातून पाण्याच्या दोन इलेक्ट्रिक मोटारी चोरीला गेल्या आहेत. तर ज्ञानदेव नगरातून रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट चोरट्यांनी लंपास केली. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन घरांमधून पाण्याच्या मोटारी लंपास

पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीलगत सचिन कॉलनी आणि इंद्रदेवजी नगर येथे राहणारे राजेंद्र उमराणे आणि त्यांचे शेजारी विश्वनाथ बारी यांच्या घराबाहेर पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी बसवण्यात आल्या होत्या. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी संधी साधत दोन्ही मोटारी लंपास केल्या. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने संतप्त नागरिकांनी पोलीस ठाणे गाठून निवेदन दिले आहे.

बुलेट ढकलत नेली अन् पुढे सुरू करून पळवली

दुसरी घटना ज्ञानदेव नगरात घडली. येथील रहिवासी चेतन अनिल भंगाळे (वय ३०) यांची एमएच १९ ईयू ७६१९ क्रमांकाची रॉयल एनफिल्ड कंपनीची हंटर बुलेट चोरट्यांनी लंपास केली. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी शुक्रवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, चोरट्याने घरासमोर उभी असलेली बुलेट सुरुवातीला काही अंतर ढकलत नेली. त्यानंतर ती सुरू करून पळ काढला. भंगाळे यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने ही घटना पाहिली होती. तिच्या सांगण्यानुसार, चोरट्याने चेहऱ्याला पांढरा रुमाल बांधला होता. परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल योगेश जाधव करीत आहेत.

चार महिन्यांत पाचवी चोरी; नागरिक हैराण

मयूर कॉलनीलगत असलेल्या सचिन कॉलनी परिसरात गेल्या चार महिन्यांत चोरीची ही पाचवी घटना आहे. या भागात तुरळक वस्ती असल्याने चोरट्यांना चोरी करून पसार होण्यासाठी मोकळीक मिळते. यापूर्वी चोरट्यांनी एक पाण्याची मोटार, पाण्याची टाकी आणि घराचा चार पायऱ्यांचा लोखंडी जिनादेखील लंपास केला आहे.

एकामागून एक घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंद घरे आणि मालमत्तांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button