गुन्हेभुसावळ

भुसावळमध्ये एमडी ड्रग्जचा साठा जप्त; चौघांना अटक, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । अंमली पदार्थांविरोधात भुसावळ तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत किन्ही एमआयडीसी परिसरात पहाटे छापा टाकून ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त केला. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, दोन मोटारसायकली आणि चार मोबाईलसह एकूण ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई ६ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे २.५५ वाजता करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किन्ही एमआयडीसी परिसरात एमडी ड्रग्जची विक्री आणि साठवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पथकासह परिसरात छापा टाकला. या कारवाईत ६२.२१ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. या ड्रग्जची किंमत २ लाख ४८ हजार ८४० रुपये असून, त्यापैकी ५५.३३ ग्रॅम एमडी असगरखान याच्याकडून हस्तगत करण्यात आले.

या प्रकरणी रिशभ कुणाल खेडकर (वय १८, रा. कंडारी, भुसावळ), प्रथमेश दिलीप आव्हाड (वय २७, रा. दादासाहेब रुपवते सोसायटी, भुसावळ), शेख अफजल शेख रहेमतुल्ला (वय २६, रा. नसरंजी फाईल, भुसावळ) आणि असगरखान अनवरखान (वय ५७, रा. अयान कॉलनी, भुसावळ) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी ड्रग्जसह दोन मोटारसायकलीही जप्त केल्या आहेत. यामध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट आणि पल्सरचा समावेश असून, त्यांची किंमत ३ लाख २५ हजार रुपये आहे. तसेच आयफोन १६, आयफोन १३, टेक्नो आणि रेडमी अशा चार मोबाईल हँडसेटची किंमत १ लाख ५५ हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button