जळगाव जिल्हागुन्हे

लाच महागात पडणार! जळगाव जि.प.च्या दोघा अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेलेले उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांच्यावर आता निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. या दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिली आहे.

२ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या बांधकाम विभागात कारवाई केली होती. या कारवाईत उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे आणि कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.

या प्रकरणानंतर दोन्ही अधिकाऱ्यांवर विभागीय पातळीवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कारवाईचा अधिकृत अहवाल अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सध्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एसीबीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे या लाचखोरी प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई अटळ मानली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button