
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीच्या उत्साहात यंदा जळगावकरांना थंडीची चाहूल अनुभवायला मिळणार आहे. लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेच्या दिवशी जळगाव शहरातील किमान तापमान १५ ते १६ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. सध्या किमान तापमान १५ ते १८ अंशांदरम्यान नोंदवले जात असून, पुढील चार ते पाच दिवसांत पाऱ्यात आणखी एक ते दोन अंशांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री गारवा, दुपारी मात्र उन्हाचा चटका, असे संमिश्र वातावरण दिवाळीत अनुभवायला मिळणार आहे.
शनिवारी जळगाव शहरात कमाल तापमान ३३.९ अंश, तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे सायंकाळनंतर वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. सध्या पहाटे आणि रात्री थंडीची जाणीव होत असली, तरी दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा कायम आहे. कमाल तापमान ३१ ते ३४ अंशांच्या दरम्यान राहत असल्याने नागरिकांना दुहेरी ऋतूचा अनुभव येत आहे.
लक्ष्मीपूजनाला पहाटे गारवा, दुपारी उन्हाचा चटका
८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे किमान तापमान १५ ते १८ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. तर दुपारच्या वेळी कमाल तापमान ३१ ते ३४ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदेच्या दिवशीही पहाटे किमान तापमान सुमारे १६ अंशांवर राहू शकते. त्यामुळे सकाळच्या वेळी बोचरी थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील कोरड्या वाऱ्यांमुळे थंडीत वाढ
आकाश पूर्णपणे निरभ्र असल्याने दिवसा साठलेली उष्णता रात्री जमिनीतून वेगाने बाहेर पडत आहे. त्यातच उत्तरेकडून आणि पूर्वेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. देशातील बहुतांश भागांत कोरडे हवामान असल्याने या वाऱ्यांचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातही जाणवत आहे. त्यामुळे रात्रीच्या तापमानात घट होऊन गारवा वाढत आहे. दिवाळीनंतर पुढील तीन दिवस रात्रीचे तापमान काहीसे स्थिर राहण्याची शक्यता आहे. एकूणच यंदा जळगावकरांची दिवाळी पहाटेच्या थंडगार वातावरणात आणि दुपारच्या उन्हाच्या चटक्यात साजरी होणार आहे.





