गुन्हेजळगाव जिल्हा

जळगावात वाळू तस्करांवर मोठी कारवाई; ३ डंपर, २ ट्रॅक्टरसह ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला असून अशातच जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी एकूण ५ गुन्हे दाखल केले असून, ७ आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत ३ डंपर, २ ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण ५० लाख १० हजार ०२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष पथके तयार करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित पोलीस ठाण्यांनी अवैध वाळू वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले होते. या मोहिमेअंतर्गत ४ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.

भडगावमध्ये ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

भडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने वलवाडी बुद्रुक येथे कारवाई करत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यावेळी १२ ब्रास वाळू आणि दोन डंपर असा एकूण ४१ लाख ३२ हजार ६६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत सर्वाधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

नशिराबादमध्ये डंपरसह वाळू पकडली

नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जणाण्या तरसोड फाट्याजवळील महामार्ग पुलावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ३ ब्रास वाळू आणि एक डंपर असा सुमारे ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

फुकनगरीच्या नदीपात्रात तीन कारवाया

जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने फुकनगरी गावाच्या नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात तीन स्वतंत्र कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत एक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून एक ब्रास वाळू आणि ट्रॅक्टर असा २ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत ३ ते ४ ब्रास वाळू आणि एक ट्रॅक्टर असा २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर तिसऱ्या कारवाईत एक ब्रास वाळू आणि ट्रॅक्टर असा २ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या तीन कारवायांमध्ये तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. अवैध वाळू व्यवसायाला आळा घालण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button