जळगाव शहर

जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! आमदार राजूमामा भोळेंच्या पाठपुराव्याला यश

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जळगाव महानगरपालिकेला १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विशेष तरतुदीअंतर्गत हा निधी मंजूर झाला असून, याबाबतचा शासन निर्णय ५ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जळगाव शहरासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून शहरातील १९ प्रभागांमध्ये विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच शहराच्या प्रमुख प्रवेशमार्गांवर प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यासोबतच नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, दर्जेदार रस्ते आणि मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले प्राधान्य असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. याशिवाय शहरातील प्रलंबित रस्ते विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जळगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय सावकारे यांचे आभार मानले.

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, शहराच्या विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी भूमिका आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी व्यक्त केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button