
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीचा पहिला दिवस असलेल्या वसुबारसेनिमित्त जळगाव शहरातील पांझरापोळ गोशाळेत सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गाय आणि वासराचे विधिवत पूजन करून भाविकांनी सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
हिंदू धर्मात वसुबारस या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची परंपरा असून गोमातेच्या पूजनाने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून पांझरापोळ गोशाळेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत गोमातेचे पूजन केले. यावेळी गायींना ढेप, केळी आणि विविध खाद्यपदार्थ अर्पण करण्यात आले.
दुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना
यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यातच जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर वसुबारसेच्या दिवशी भाविकांनी गोमातेचे पूजन करत जिल्ह्यातील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, पाणी आणि चाऱ्याची टंचाई संपुष्टात यावी, अशी प्रार्थना केली.
वसुबारसेनिमित्त पांझरापोळ गोशाळेत दिवसभर भक्तिमय वातावरण होते. गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करत जळगावकरांनी पारंपरिक पद्धतीने दीपावलीच्या सणाचा शुभारंभ केला.





