
जळगाव लाईव्ह न्यूज । श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संस्था रविवार, २० डिसेंबर रोजी जळगाव शहरात हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणार आहे. सदरचे आयोजन हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या १९ डिसेंबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणार आहे.
या स्पर्धेची नावनोंदणी प्रक्रिया व्यवस्थापकीय संचालक श्री रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते सुरु करण्यात आली. यावेळी स्पर्धेचे समन्वयक डॉ. एम व्ही रावलानी व डॉ. प्रदीप एम सोलंकी तसेच रेस डायरेक्टर प्रा. प्रवीण पाटील व डॉ. दिनेश पुरी हे देखील उपस्थित होते. सर्वप्रथम 5 किमी मध्ये आपले नाव नोंदवून श्री रावसाहेब शेखावत यांनी याप्रसंगी सांगितले कि संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे यावर्षीची ही हाफ मॅरेथॉन स्पर्धा शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करून त्यांना समर्पित राहणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची संकल्पना “जलगाव रन्स फॉर फार्मर्स” अशी आहे. शिवाय या स्पर्धेतून प्राप्त होणारा निधी हा मुख्यमंत्री दुष्काळ निवारण सहायता निधीस मदत म्हणून देण्यात येईल. त्यामुळे संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व महाराष्ट्रातील अधिकाधिक नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
ही स्पर्धा जळगाव शहरातील खानदेश सेंट्रल मॉलच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार असून स्पर्धेचा मार्ग जळगाव शहरातून असणार आहे. स्पर्धा २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर व ३ किलोमीटर अशा चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आली आहे. २१ किलोमीटर व १० किलोमीटरची स्पर्धा ही आर एफ आय डी प्रणाली द्वारा आयोजित करण्यात आली असून सदरची स्पर्धा ही टाईम रन असेल. ३ किमीसाठी प्रत्येक स्पर्धकास ३५० रुपये, ५ किमीसाठी ५०० रुपये, १० किमीसाठी ७०० रुपये तर २१ किमीसाठी ९00 रुपये फी असणार आहे. शिवाय एस एस बी टी संस्थेच्या विद्यार्थ्यांना 50% सवलत राहणार आहे.
प्रत्येक स्पर्धकास आयोजकांतर्फे रनिंगचा टी-शर्ट, धाव पूर्ण केल्यानंतर पदक, प्रमाणपत्र व नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय धावण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी पेयजल, बिस्कीट, चॉकलेट, निमगोळी, एनर्जल, लिंबू पाणी, हायड्रेशन सपोर्ट व वैद्यकीय सेवा पुरवली जाईल. त्याचबरोबर २१ किमी व १० किलोमीटरच्या स्पर्धेसाठी बक्षीसे देखील ठेवण्यात आलेली आहेत. २१ किलोमीटर व १० किलोमीटर या दोन्ही श्रेणीमध्ये प्रथम विजेत्या स्पर्धकास ११000/- रुपये, द्वितीय विजेत्यास ७५00/- रुपये व तृतीय विजेत्या स्पर्धकास ५000 रुपये शिवाय मानपत्र, बोधचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे
नावनोंदणी www.konfhub.com या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून करता येईल. ऑफलाईन अर्ज महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागात तसेच गोधडीवाला बुक डेपो – सिंधी कॉलनी, रमेश गारमेंट्स – सेंट्रल फुले मार्केट व योगद्वार – सिंधी कॉलनी, जळगाव शहरात या ठिकाणी उपलब्ध आहेत.
यावेळी डॉ एस बी पवार, डॉ अमोल लांडगे, डॉ किरण पाटील, डॉ पंकज पुनासे, एस आर गिरासे, जयदेवसिंग रावल, भागवत पाटील, वीरेंद्र मोरे, जे बी शिसोदिया, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.





