गुन्हेजळगाव शहर

एमआयडीसी पोलिसांकडून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड

जळगाव लाईव्ह न्यूज । एमआयडीसी पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एका ३४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन बालकाकडूनही चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांतील चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

अजिंठा चौफुली परिसरातून दुचाकी चोरी
जळगाव शहरातील शनिपेठ परिसरात राहणारे तरबेज सैय्यद आसिफ यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल अजिंठा चौफुलीजवळील ईदगाह कॉम्प्लेक्स येथील रिलायबल लॉजिंगच्या खाली पार्किंगमध्ये उभी केली होती. वैयक्तिक काम आटोपून ते परत आले असता पार्किंगच्या ठिकाणी त्यांची दुचाकी दिसून आली नाही.

याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सुरू केला.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. त्यानुसार सुलेमान अरमान तडवी (वय ३४, रा. किनगाव, ता. यावल) याची ओळख पटली. पोलिसांनी ३ नोव्हेंबर रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.

कुसुंबा येथील चोरीचाही उलगडा
दरम्यान, दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील कैलास पाटील यांची काळ्या रंगाची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कुसुंबा शिवारातून चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८७९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चोरीचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केला. तपासादरम्यान चोरी करणाऱ्या संशयिताची ओळख पटली. मात्र, संबंधित आरोपी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल हस्तगत केली.

दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोटारसायकली हस्तगत केल्याने दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, गजानन महाजन, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, सुभाष साबळे, ललित नारखेडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विष्णू बिर्‍हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button