सणासुदीला गावी जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; भुसावळ मार्गे धावणाऱ्या तीन रेल्वे गाड्यांना मुदतवाढ

सप्टेंबर 19, 2026 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भुसावळ मार्गे धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-रक्सौल, एलटीटी-सहरसा आणि हडपसर-मुजफ्फरपूर या विशेष गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ देण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, संबंधित विशेष गाड्यांच्या एकूण ६२ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

train

एलटीटी-रक्सौल साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०५५५८ पूर्वी गुरुवारी धावत होती. आता या गाडीच्या सेवेला २४ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत एकूण १० फेऱ्या होतील.

त्याचप्रमाणे रक्सौल-एलटीटी विशेष गाडी क्रमांक ०५५५७ मंगळवारी धावते. या गाडीच्या सेवेलाही २२ सप्टेंबर ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली असून, एकूण १० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

एलटीटी-सहरसा गाडीच्याही फेऱ्या वाढल्या

एलटीटी-सहरसा साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०५५८६ रविवारी धावणार आहे. तर सहरसा-एलटीटी विशेष गाडी क्रमांक ०५५८५ शुक्रवारी धावते. या दोन्ही सेवांच्या फेऱ्यांनाही मुदतवाढ देण्यात आली असून, संबंधित गाड्यांच्या ११ फेऱ्या करण्याचे नियोजन आहे.

हडपसर-मुजफ्फरपूर मार्गावरही अतिरिक्त फेऱ्या

हडपसर-मुजफ्फरपूर विशेष गाडी क्रमांक ०५५९० गुरुवारी धावते. या गाडीच्या सेवेला २४ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली असून, १० अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. तर मुजफ्फरपूर-हडपसर विशेष गाडी क्रमांक ०५५८९ मंगळवारी धावणार असून, २२ सप्टेंबर ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तिच्या १० फेऱ्या चालवण्यात येतील.

सणासुदीच्या काळात उत्तर भारताकडे जाणाऱ्या तसेच परतीच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर विशेष गाड्यांच्या सेवेला देण्यात आलेली मुदतवाढ प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now