जळगावात २३ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

ऑगस्ट 21, 2026 4:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर बाबींचे सोप्या भाषेत व मोफत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे येत्या २३ ऑगस्ट रोजी मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या नेतृत्वाखालील या फाउंडेशनचे हे तिसरे शिबिर असून, ते सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत श्री साईबाबा मंदिर, मेहरूण, जळगाव येथे पार पडणार आहे.

AN

‘न्याय विश्वास फाउंडेशन’च्या माध्यमातून यापूर्वी पार पडलेल्या दोन शिबिरांमध्ये ५०० हून अधिक नागरिकांनी कायदेशीर सल्ला घेतला आहे. जळगावकरांकडून मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हे तिसरे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे अध्यक्ष ॲड. अनिकेत निकम यांनी सांगितले.

या शिबिरामध्ये जमीन व मालमत्ताविषयक प्रश्न, ७/१२ उतारा, पती-पत्नीमधील वाद, कौटुंबिक समस्या, पोलीस तक्रारी, एफआयआर, प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे, सायबर गुन्हे आणि ऑनलाईन आर्थिक फसवणूक यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञ वकिलांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर अधिकार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय स्तरावर मिळणाऱ्या मोफत कायदेशीर मदतीची माहितीही यावेळी दिली जाईल.

शिबिरास उपस्थित राहताना नागरिकांनी आधार कार्ड किंवा अन्य वैध ओळखपत्र, तसेच समस्येशी संबंधित जमिनीची, पोलिसांची अथवा न्यायालयाची कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now