जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जळगाव पोलिसांनी एक विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ५,६७० वाहनचालकांविरुद्ध कारवाई करत ३९ लाख ७० हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उपस्थित राहून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत होते. सकाळी, सायंकाळी तसेच रात्री ११ वाजेपर्यंत कारवाई सुरू ठेवण्यात आली.

मोहिमेदरम्यान विना हेल्मेट वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, बेकायदेशीर पार्किंग, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, अल्पवयीनांकडून वाहन चालविणे, सिग्नल उल्लंघन, ट्रिपल सीट, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, नो-लाइट/रिफ्लेक्टर नसणे, रॉंग साईड ड्रायव्हिंग, विना परवाना शालेय वाहतूक, शाळा-कॉलेज परिसरातील नियमभंग तसेच इतर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
यात जिल्हा पोलीस दल मार्फत ५६७० वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून ३९ लाख ७० हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर महामार्ग सुरक्षा पथकाने (HSP) स्वतंत्रपणे १,४३५ केसेस करून १२ लाख ७५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. जिल्हा पोलीस दल आणि महामार्ग सुरक्षा पथकाची मिळून एकूण ७,१०५ केसेस करण्यात आल्या असून, एकूण ५२ लाख ४५ हजार ४५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
दरम्यान, वाहनचालकांनी सणांचा आनंद घेताना वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, हेल्मेटचा वापर करावा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये तसेच रस्त्यावर इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, जळगाव तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा तसेच महामार्ग सुरक्षा पथकातील अधिकारी व अंमलदारांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.











