जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पाऊस सुट्टीवर गेला असून आता पुढील काही दिवसही मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. हवामानात झालेल्या या बदलामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी पावसाची गरज असताना शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात व्यापक किंवा मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात केवळ हलक्या पावसाचा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यात आजपासून २१ ते २३ ऑगस्टदरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. २१ ऑगस्ट रोजी दुपारनंतर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर २२ आणि २३ ऑगस्टलाही काही भागांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

मात्र, या काळात मुसळधार किंवा सलग पावसाची शक्यता कमी असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दमदार पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसानंतर काही काळ वातावरणात गारवा जाणवेल; मात्र पाऊस थांबल्यानंतर पुन्हा उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
पावसाचे जोर कमी होण्याचे कारण?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत मध्य प्रदेशाच्या दिशेने गेला आहे. त्याचवेळी नवीन हवामान प्रणाली विकसित होण्याची प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे वेगाने होत नसल्याने महाराष्ट्रात जोरदार पावसासाठी आवश्यक वातावरण सध्या तयार झालेले नाही.अरबी समुद्रातील पावसाच्या ढगांची सक्रियताही कमी झाली आहे. त्यामुळे पश्चिमेकडून उत्तर महाराष्ट्राकडे येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांचा पुरवठा मर्यादित झाला आहे. परिणामी जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येत आहे.
खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांची चिंता
सध्या खरीप पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता असताना पावसाने घेतलेल्या उघडीपमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. काही भागांत पिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन हवामान प्रणाली सक्रिय होते का आणि राज्यात पुन्हा दमदार पाऊस दाखल होतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.








