नफ्याच्या भूलथापांना बळी ! जळगावच्या ज्येष्ठ वकिलाची तब्बल ७.६० लाखांची फसवणूक

ऑगस्ट 20, 2026 9:11 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । शेअर मार्केट आणि गुंतवणुकीतून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला असून, आंतरराष्ट्रीय फंड कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा मोठा परतावा, रेफरल कमिशन आणि कंपनीचे शेअर्स देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका ज्येष्ठ वकिलाची तब्बल ७ लाख ६० हजार ८२० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात पुण्यातील दोन संशयितांविरुद्ध फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

नेमका प्रकार काय?

विसनजीनगरातील वकील विजय बाबूलाल दाणेज यांना पुण्याच्या विनोद निमानाथ सोनार (रा. मार्केट यार्ड, कात्रज, पुणे) व आनंद परदेशी (रा.पुणे) या दोघांनी फोनवरून संपर्क साधला. संशयितांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना रोसनेफ्ट फंड इंडिया डिव्हिजन या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. या कंपनीत रक्कम गुंतवल्यास दरमहा ७० टक्के ते ३६० टक्के नफा, १० टक्के रेफरल कमिशन, १० टक्के बायनरी कमिशन आणि कंपनीचे अधिकृत शेअर्स मिळतील, असे मोठे आमिष त्यांनी अॅड. दाणेज यांना दाखवले.

भामट्यांच्या भूलथापांना बळी पडून अॅड. दाणेज यांनी ६ जून २०१६ ते २८ मार्च २०२० या कालावधीत नेटबँकिंगद्वारे संबंधितांच्या बिटकॉइन वॉलेटवर ७ लाख १० हजार ८२० रुपये किमतीचे ०,५८८५६७८० इतके बिटकॉइन ट्रान्सफर केले. याव्यतिरिक्त भामट्यांच्या बँक खात्यात ५० हजार रुपये रोख ऑनलाइन भरले. अशा रीतीने संशयितांनी फिर्यादीकडून वेळोवेळी एकूण ७ लाख ६० हजार ८२० रुपये स्वीकारले; मात्र मुदत उलटून गेल्यानंतरही गुंतवणुकीची रक्कम, परतावा किंवा कंपनीचे शेअर्स न देता आरोपींनी त्यांची फसवणूक केली.

जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर अॅड. दाणेज यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विनोद निमानाथ सोनार व आनंद परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now