जळगाव लाईव्ह न्यूज । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर ते मडगाव दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीच्या एकूण ६ फेऱ्या होणार असून, भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आल्याने खान्देशातील गणेशभक्त आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव विशेष ट्रेन १९ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान दर बुधवारी रात्री ११.४५ वाजता नागपूरहून रवाना होईल. तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११४० मडगाव-नागपूर विशेष १८ ऑगस्ट ते २२ सप्टेंबरदरम्यान दर मंगळवारी सायंकाळी ७ वाजता मडगावहून सुटणार आहे.

या विशेष गाडीला एकूण १९ डबे असतील. यामध्ये वातानुकूलित तृतीय श्रेणी (एसी-३), शयनयान (स्लीपर) तसेच सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे उपलब्ध असणार आहेत.
या स्थानकांवर मिळणार थांबा
नागपूर-मडगाव विशेष ट्रेनला वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव, भुसावळसह खान्देशातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध झाली आहे.
आरक्षणासाठी रेल्वे अॅपचा वापर
या विशेष ट्रेनचे आरक्षण करण्यासाठी रेल्वेच्या ‘रेलवन’ अॅपचा वापर करता येणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची वेळ, उपलब्धता आणि सद्यस्थिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने या विशेष ट्रेनचा खान्देशातील भाविकांना मोठा फायदा होणार आहे.











