जळगावच्या दाणाबाजारातील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

ऑगस्ट 20, 2026 5:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील गजबजलेल्या दाणा बाजार परिसरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेने गुरुवारी सकाळी धडक मोहीम राबवली. सकाळी साडेदहा वाजता सुभाष पुतळ्यापासून सुरू झालेल्या या कारवाईत रस्त्याच्या जागेत वाढविण्यात आलेले दुकानांचे भाग हटविण्यात आले. सुरुवातीला तीन दुकानांवरील अतिक्रमण काढल्यानंतर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले.

danabajar

उपायुक्त पंकज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली. महापालिकेच्या पथकाने दाणा बाजारातील रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. कारवाई सुरू असतानाच तीन दुकानांवरील अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे संबंधित व्यापारी आणि प्रशासनामध्ये शाब्दिक वादाची परिस्थिती निर्माण झाली.

टीपी विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण

व्यापाऱ्यांचा विरोध वाढत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने टीपी विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. यानंतर अतिक्रमित जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. दुकानांची हद्द आणि रस्त्याची जागा निश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित ठिकाणी मार्किंग करून दिली.

मार्किंगनंतर व्यापाऱ्यांनीही भूमिका बदलत प्रशासनाला सहकार्य करण्यास सुरुवात केली. अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोरील अतिक्रमित भाग स्वतःहून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे कारवाईदरम्यान निर्माण झालेला तणाव काही वेळात निवळला.

सोमवारी पुन्हा धडक कारवाई

दाणा बाजारातील सर्व अतिक्रमणे अद्याप हटविण्यात आलेली नसून उर्वरित अतिक्रमणांवर सोमवारी पुन्हा कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सोमवारी महापालिकेचे पथक कोणत्या भागात कारवाई करणार, याकडे व्यापाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दाणा बाजार परिसरात अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. सार्वजनिक रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now