कार, ॲपे रिक्षा आणि दुचाकीचा भीषण तिहेरी अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

ऑगस्ट 21, 2026 12:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून अशातच भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावरील लालमाती परिसरातील पहिलवान ढाब्याजवळ कार, ॲपे रिक्षा आणि दुचाकीचा भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात मध्य प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, राजेश चव्हाण (वय ४५, रा. फोकणार धाबे, मध्य प्रदेश) असं अपघातातील मृताचे नाव आहे. तर तिघे जखमी झाले.

tiheriacd

मिळालेल्या माहितीनुसार, टोयोटा कार (एमपी.०९-एझेड.२५५५) भुसावळकडून मुक्ताईनगरच्या दिशेने जात होती. कारने पुढे जात असलेल्या दुचाकीला (एमपी.६८-एमडी.८७५८) कट मारला. त्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने पुढे असलेल्या ॲपे रिक्षाला (एमएच.१९-बीयू.६६८२) मागून जोरदार धडक दिली.

या अपघातात ॲपे रिक्षातील राजेश चव्हाण आणि दुर्गेशकुमार (वय २५, रा. बिहार), तसेच दुचाकीवरील समाधान डोळे (वय ५०) आणि मनीषा समाधान डोळे (वय ३०, रा. जळगाव) जखमी झाले.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करत सर्व जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी राजेश चव्हाण यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच वरणगावचे एपीआय अमितकुमार बागुल, पोलिस कर्मचारी प्रशांत ठाकूर, यासिन पिंजारी, मनोज म्हस्के आणि विकास वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. दरम्यान, अपघातानंतर कार आणि ॲपे रिक्षाचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती असून, त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. याप्रकरणी वरणगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या मार्गावर यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांकडून काही काळापूर्वी महामार्गावरील अपघातप्रवण अर्थात ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याने संबंधित विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now